Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवकालीन किल्ल्यांच्या जतनासाठी 'राजस्थान पॅटर्न', यामुळे हे किल्ले हेरिटेज साइट बनतील?

raigad fort
, रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (13:08 IST)
महाराष्ट्रातले 12 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीत यावेत यासाठी सरकार कडून नामांकन पाठवण्यात आले आहे.
यामध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, लोहगड रायगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.
 
या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खास प्लॅनही तयार करण्यात आला आहे आणि त्यासाठी मदत घेतली जात आहे ती राजस्थानच्या वास्तुविशारद आणि राजस्थानच्या संवर्धनाच्या पॅटर्नची.
 
काय आहे राजस्थान पॅटर्न?
महाराष्ट्रातल्या कोणत्याही किल्ल्यावर गेलं की पडझड व्हायला लागलेले बुरुज, तटबंद्या आणि त्यावर कोरलेली नावं हे चित्र दिसतं. ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याबाबत तर वारंवार जनजागृती करुनही फारसा फरक पडत नाहीये.
 
अनेक किल्ल्यांवर खाणं विकणारी झोपडीवजा ठिकाणं तयार झाली आहेत. पण राजस्थान मध्ये मात्र याच्या अगदी उलट चित्र दिसतं
 
सुंदर सुबक नक्षीकाम, कोरीवकाम केलेले खांब, इमारती आणि स्वच्छ किल्ले, महाल आणि एखादंच पण अधिकृतपणे उभारलं गेलेलं कॅफे हे राजस्थान मधलं दृश्य आपल्याला अगदीच विरोधाभास दाखवून देतं.
 
महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या पडझडीला किल्ल्यांवर मुघलांपासून ब्रिटीशांपर्यंत झालेले हल्ले आणि त्याउलड राजस्थान मध्ये दिसणाऱ्या सौंदर्याला तिथल्या राजांनी तह केल्यामुळे वाचलेल्या ऐतिहासिक वास्तु हे कारण आहेच.
 
पण त्याचबरोबर एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तिथल्या सरकारचं संवर्धनाचं धोरण. संरक्षित मालमत्ता खासगी असो की सरकारी, सगळ्याच ठिकाणी सतत संवर्धनासाठी काम केलं जातंय.
बिकानेर मधल्या जुनागढ किल्ल्यात आम्ही पोहोचलो तेव्हा इथे नावाप्रमाणे जुनं झालेलं काहीच दिसत नव्हतं.
 
काहीच वेळात त्याचं कारण आम्हांला कळलं जेव्हा आम्हांला नियाज महम्मद उस्ता भेटले.
 
किल्ल्यात जी दारं बंद होती त्यांच्या आड अगदी कोणालाही कळणार नाही इतक्या शांतपणे हे उस्ता आपलं काम करत होते.
 
हे काम होतं जुनं झालेलं नक्षीकाम पूर्ववत करण्याचं. अगदी जुन्या काळापासून उस्ता आर्टिस्ट हे काम करतात. नैसर्गिक रंग वापरून किल्ल्याला केलेलं जुनं नक्षीकाम ते पूर्ववत करत असतात.
 
अगदी एक छोटंसं चित्र साकारायला त्यांना आठवडाभर काम करावं लागतं. उस्ता आर्टिस्टचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी जिथं सोन्याने कारागिरी केली जायची तीसुद्धा तशीच नव्याने करण्याची कला त्यांंना अवगत आहे.
 
नवं काम करताना सोनंच वापरून ते करतात. यामुळेच कुठे काही जीर्ण झालंय असं तुमच्या नजरेस पडत नाही.
बीबीसी मराठीशी बोलताना नियाज उस्तांनी आपली ही कलाकुसर कशी करतो त्याची पद्धत सांगितली. ते म्हणाले, “ रंगीत दगडापासून बनलेला नैसर्गिक रंग आम्ही यासाठी वापरतो. जुन्या आणि नव्या कामात कोणताही फरक दिसत नाही. तेवढीच मजबुती असते. सोन्याचं काम करण्यासाठी आधी डिंक लावतो आणि मग तो वाळायच्या वेळी फॉईल चिकटवतो.”
 
उस्ता ज्यांच्यासाठी काम करतात ते जुनागढचे वंशज स्वतः संवर्धनाचं काम करतात. बिकानेरच्या या जुनागढ संस्थानच्याच संस्थानिकांचा महाल म्हणजे लालगढ.
 
लालगढ महालात सध्या दोन कॅफे चालवले जातात. यातलं एक संस्थानच्या राजकुमारी राज्यश्रीदेवी स्वत चालवतात तर दुसऱ्या भागात एका खाजगी व्यावसायिकदारांना हॅाटेल चालवायला देण्यात आले आहे. या महालात गेलं की कुठेही जुनागढ किल्ल्याप्रमाणेच जीर्णपणा जाणवत नाही. पण या दोन्ही वास्तू जितक्या सुंदर दिसतात तितक्या त्या जतन करणं सोपं काम नाही.
 
राजकुमारी राज्यश्रीदेवी सांगतात ," माझे वडील डॉ. कर्णीसिंग यांनी भविष्याचा विचार केला आणि 60 च्या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी किल्ल्याचं संग्रहालय केलं. हा किल्ला जवळपास 500 वर्षं जुना आहे. आणि महालाचेही काही भाग शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत.
 
त्यांना कायम डागडुजीची गरज पडते. आम्हांला मिळणाऱ्या पैशातून आम्ही मेन्टेनन्स करतो. यासाठी आम्ही एक ट्रस्ट स्थापन केला आहे. किल्ला हा याचा मुख्य भाग. काही वेळा याचे काही भाग तुटून पडतात. ते नव्याने उभारावे लागतात.”
राजस्थानचे हे प्रयत्न सुरू होण्याचा इतिहास मोठा आहे. राजस्थानमधील संस्थानं खालसा झाली. त्यानंतर काही वास्तु सरकारच्या ताब्यात गेल्या तर काहीच राजघराण्यांकडेच राहिल्या.
 
या वास्तू सांभाळता येईनात तेव्हा अनेक राजांनी त्यांचं रुपांतर हॉटेलमध्ये करायला सुरूवात केली. त्यासाठी तेव्हा सरकारनेही धोरण आखत सबसिडी जाहीर केली. यात फक्त महाल नव्हते तर अनेक ठिकाणच्या हवेल्याही होत्या. महालांप्रमाणेच हवेल्यांचेही हॉटेल्स झाले.
 
यातलंच एक हॉटेल आहे जैसलमेरच्या राजघराण्यातल्या विक्रमसिंग भाटींचं- नाचना हवेली
 
हे त्यांचं निवासस्थान, हॉटेल, रेस्टॅारंट आणि दुकानं असं सगळंच असणाऱ्या अगदी तुरळक वास्तुंपैकी एक.
 
हवेलीचं संवर्धन करायला घेतलं तेव्हा आपल्याला इतक्या अडचणींचा सामना करावा लागेल हे डोक्यातही आलं नसल्याचं ते सांगतात.
 
आपल्या अनुभवावरुन त्यांनी अशा पद्धतीने राजस्थानमध्ये काय आणि कसं संवर्धित करता येईल यासाठी इन्टेकसोबत काम करायला सुरुवात केली आहे. अर्थात संवर्धन करणं सोपं नव्हतं असंही ते सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना भाटी म्हणाले , "मी 1996 मध्ये आपल्या बहिणीसोबत हे हॅाटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फक्त 6 खोल्यांमध्ये हॉटेल उभारलं होतं. पण याला मिळालेला प्रतिसाद असा होता की मग आम्ही विस्तार केला. पण हे करणं सोपं नव्हतं. अगदी सामानच नाही तर पाणीसुद्धा उंटगाडीतून आणावं लागत होतं.
 
एखादा खिळा ठोकायचा म्हणलं तरी ते इतकं काळजीपूर्वक करावं लागायचं की त्यासाठी तास लागायचा. मला कधी कधी वाटायचं की आपण नक्की काय करतोय. पण त्यातून ही वास्तू उभारली गेली. आता आम्ही राजस्थानमध्ये आणखी काय करता येईल याचा प्रयत्न करतोय.”
भाटींची हवेली असणाऱ्या जैसलमेर मधला संपूर्ण किल्लाच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केला गेला आहे. ज्या किल्ल्यात वसाहत आहे अशा किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषणा झाली आणि निधी आला. त्यासाठी स्थानिकांनी अभियानही राबवलं.
 
यातून किल्ल्याचं संवर्धन झालं. अर्थात संवर्धनानंतर कोणता भाग जुना आणि कोणता नवा हे ओळखताही येत नाही इतक्या खुबीने ते एकमेकांमध्ये मिसळले गेले आहेत.
 
यासाठी राजस्थान सरकारचं धोरण कारणीभूत असल्याचं वास्तुविशारद शिखा जैन सांगतात.
राजस्थानचा इतिहास पाहिला तर पारंपारिक कला अवगत असलेले अनेक लोक आहेत. दगड, चुना किंवा पेंटिंग अशा सगळ्याच प्रकारच्या कलांमध्ये पारंगत कारागिर राजस्थानमध्ये आढळतात.
 
कारण या कारागिरांना राजघराण्यांनी सांभाळले. 1980-1990 च्या दशकात सरकारला ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ही कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांचाच भाग म्हणून सगळ्यात आधी त्यांना दिला जाणारा मोबदला सरकारने वाढवला.
 
आधी पीडब्ल्युडीच्या किंमती प्रमाणे हे पैसे दिले जायचे. राजस्थान सरकारने संवर्धनासाठी काम करणाऱ्यांना स्पेशल रेटने पैसे देणं सुरु ठेवलं आणि कला जिवंत राहिली.
 
याबरोबरच सरकारने या वास्तूंचं महत्व ओळखून दरवर्षी नव्याने यादी करुन जुन्या वास्तूंचं संवर्धन सुरु केलं. किल्ले महाल यांच्या बरोबरीनेच देवळं, विहिरी यांचंही संवर्धन सरकारकडून केलं गेलं. याचा परिणाम म्हणून येणारे पर्यटक वाढले.
 
पर्यटनातून येणारा पैसा वाढला आणि तोच पैसा पुन्हा संवर्धनासाठी वापरला जाऊ लागला. कानाकोपऱ्यातल्या वास्तूंचा शोध दरवर्षी इथला सरकारी विभाग घेत असतो आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन करत असतो.
 
राजस्थान आर्किअॅलॅाजी विभागाचे संचालक महेंद्रसिंग खडगावत सांगतात , "यातून वर्षभरात कोट्यावधीचा निधी गोळा होतो. आणि त्यात सरकार पुन्हा बजेट टाकून आणखी पैसे देतं. त्यामुळे संवर्धनासाठी खास बजेट तयार होतंय.
 
प्रत्येक ठिकाणावर सुरक्षारक्षक नेमले गेले आहेत. त्यामुळे कोणी ती वास्तू खराब करु शकत नाही आणि अधिकृत कॅफेटेरिया उभारण्यासाठी जागा दिल्या त्यामुळे त्यातूनही भाडं मिळायला लागलं. उत्पन्न वाढलं की खर्च सुद्धा वाढवता येतो.”
 
महाराष्ट्रात काय करणार ?
राजस्थान मधल्या संवर्धनात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या शिखा जैन यांच्या मदतीने हेच मॅाडेल आता महाराष्ट्रात राबवण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे जैन यांनी राज्यातल्या किल्ल्यांचा अभ्यास करुन दौरा करुन 12 किल्ल्यांना जगाच्या नकाशावर आणण्यासाठी तयार केलेला प्रस्ताव.
 
याच12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं जावं यासाठी आता सरकारने प्रस्ताव पाठवला आहे.
 
जैन सांगतात " आम्ही या वास्तूंचं सर्वेक्षण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दृष्टिकोन होता त्याचं मूल्य ओळखलं गेलं पाहिजे. मराठा साम्राज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दूरदृष्टी आणि धोरणात्मकता कशी होती, हे समजावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांचा आम्ही अभ्यास केला त्यात त्यांनी स्वतःच यासाठीच्या गाईडलाईन्स लिहिल्या आहेत. म्हणजे अगदी किल्ल्याभोवती कोणत्या प्रकारची पीकं घेतली पाहिजेत हेही त्यांनी लिहिलेलं आहे.
 
अर्थात, त्याचं एक उद्दिष्ट हे किल्ल्यांची सुरक्षा होतं. यातले जे 11 मुद्दे आहेत ते सरकारने लक्षात घ्यावे अशी सूचना मी महाराष्ट्र सरकारला केली आहे. तसेच या किल्ल्यांवर राजस्थान प्रमाणे हॉटेल करणे शक्य नाही. पण साहसाच्या दृष्टीने या किल्ल्यांचा विचार केला जाऊ शकतो. महत्वाचं म्हणजे एखादी वास्तू जेव्हा जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाते तेव्हा तिथे जगभरातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढते.”
 
महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडूतला 1 अशा एकूण 12 किल्ल्यांची निवड या नामांकनासाठी झाली आहे.
 
यातल्या 10 किल्ल्यांसाठी संवर्धनाचा प्लॅन सुद्धा तयार करण्यात आला आहे. आता प्रश्न आहे तो सरकारने निधी देऊन काम सुरु करण्याचा.

Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉफी बंद केल्यानंतर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात?