Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यशस्वी जैस्वाल : पाणीपुरी विकत सराव करणाऱ्या यशस्वीचं द्विशतक

यशस्वी जैस्वाल : पाणीपुरी विकत सराव करणाऱ्या यशस्वीचं द्विशतक
, शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (15:23 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये विशाखापटट्णम इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावलं आहे. यशस्वीनं 277 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या. चौकार आणि षटकार सलग मारुन त्यानं द्वीशतक पूर्ण केलं. आतापर्यंत भारतानं 7 विकेटस गमावत 380 धावा केल्या आहेत.
 
पहिलं शतक झळकावलं तेव्हा...
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने शतक झळकावलं आहे. कसोटी पदार्पणातच यशस्वीने शतक झळकावलं होत.
 
डॉमनिका इथं कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांत आटोपला. त्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या डावावर वर्चस्व गाजवलं होतं.
 
पहिला दिवस संपला तेव्हा यशस्वी 143 धावांवर नाबाद होता.
 
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालीआणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान देण्यात आलं आहे.
 
काही दिवसांपूर्वीच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवातून बोध घेत निवडसमितीने युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून यशस्वी आणि ऋतुराजची संघात निवड करण्यात आली.
 
यशस्वी जैस्वालने गेल्या काही काळात अत्यंत दर्जेदार खेळ करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
आयपीएल स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराने त्याला गौरवण्यात आलं होतं.
 
पण, आज संघात निवड झाली असली तरी यामागचं खरं कारण केवळ IPL स्पर्धेतील कामगिरी नसून त्याने गेल्या 10-12 वर्षांत केलेली कठोर मेहनत हे आहे.
 
 
केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरची यशस्वीला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. आव्हानांसमोर न डगमगता त्याने आपलं लक्ष्य साध्य केलं आहे. पाहूया यशस्वी जैस्वालचा आजवरचा प्रवास
 
कोण आहे यशस्वी जैस्वाल?
उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत धावांच्या राशी ओततोय.
 
2015 मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध गाईल्स शिल्ड स्पर्धेत यशस्वीने नाबाद 319 धावांची खेळी केली. याच सामन्यात त्याने 13 विकेट्सही घेतल्या.
 
2019मध्ये विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध यशस्वीने 154 चेंडूत 203 धावांची आक्रमक खेळी साकारली. 17व्या वर्षी द्विशतक झळकावत स्पर्धेतला सगळ्यात कमी वयाचा द्विशतकवीर ठरला.
 
2020 मध्ये झालेल्या आयसीसी U19 स्पर्धेत यशस्वीने सर्वाधिक धावा (400) केल्या होत्या. यशस्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. याच वर्षी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने यशस्वीला ताफ्यात समाविष्ट केलं. 2022 मध्ये राजस्थानने 4 कोटी रुपयांच्या मानधनासह यशस्वीला संघात रिटेन केलं.
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ 13 डावात यशस्वीने 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वीने अमोल मुझुमदार आणि रुसी मोदी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. यशस्वीने अवघ्या 7 सामन्यात 91च्या सरासरीने खेळताना हा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करताना त्याने 80.21ची सरासरी राखली आहे.
 
रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत यशस्वीने शतक झळकावण्याची किमया केली आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही यशस्वीने द्विशतकी खेळी केली होती.
 
IPL 2023 मध्ये इमर्जिंग प्लेअर
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चर्चा झालेल्या खेळाडूंच्या नावांमध्ये यशस्वी जैस्वालचं नाव पहिल्या तीन खेळाडूंमध्ये होतं.
 
यशस्वी जैस्वालने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच धावांची टांकसाळ उघडली होती.
 
सलामीवर जैस्वाल पहिल्या चेंडूपासून हाणामारी करून प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी व्हायचा.
 
गेल्या वर्षीही यशस्वी जैस्वालने राजस्थान रॉयल्स संघासाठी चांगली कामगिरी करून त्यांना अंतिम फेरीत पोहोचवण्यात मदत केली होती. पणं यंदाच्या हंगामात यशस्वीची बॅट अक्षरशः आग ओकत असल्याचं दिसून आलं.
 
यंदाच्या हंगामात यशस्वीने 48.08 चा अव्हरेज आणि 164 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 625 धावा कुटल्या. यामध्ये 1 शतक तर 5 अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वीने या स्पर्धेत एकूण 82 चौकार आणि 26 षटकारांची नोंद केली.
 
आयपीएल स्पर्धेत एखाद्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावांचा विक्रमही या निमित्ताने यशस्वीच्या नावे झाला. 15 वर्षांपासून हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शच्या नावे होता. आहेत.
 
यासोबतच, केवळ 13 चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रमही यशस्वीने आपल्या नावे केला आहे.
 
यशस्वी जैस्वालला 2020 मध्ये पहिल्यांदा IPL स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून त्याच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. 2020 मध्ये यशस्वीला फारशी संधी मिळाली नाही. या हंगामात त्याने 3 सामन्यात 40 धावा केल्या. त्यानंतर 2021 मध्ये त्याने 10 सामन्यांमध्ये 249, 2022 मध्ये 10 सामन्यात 258 धावा केल्या.
 
गेल्या दोन हंगामात यशस्वीची सुरुवात चांगली व्हायची, मात्र नंतर तो विकेट फेकतो, अशी टीका त्याच्यावर होऊ लागली.
 
पण, यंदाच्या हंगामात यशस्वीचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. त्याने प्रत्येक संघाविरुद्ध खोऱ्याने धावा ओढल्या. तसंच यंदाच्या वेळी त्याने टोलेजंग षटकारांचीही आतषबाजी केली.
 
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने 124 धावांची तुफान खेळी केली होती. त्याचा हा खेळ पाहून मुंबईचा कर्णधारही अवाक झाला. या सामन्यानंतर समालोचकांशी बोलताना रोहित शर्माने याविषयी सांगितलं.
 
ते म्हणाला, “यशस्वीने आज अत्यंत अविस्मरणीय खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. काय खाऊन येतोस, आजकाल षटकारही खूप मारतोस, असं मी त्याला आज गंमतीने विचारलं. यशस्वी म्हणाला की मी सध्या जिम करत आहे. चांगलं आहे, यशस्वीच्या मेहनतीचं फळ त्याला मिळत आहे. त्याचा परिणाम त्याच्या खेळावरही दिसून येत आहे.”
 
आझाद मैदानासमोर तंबूत राहिला, पाणीपुरी विकत केला सराव
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, यशस्वी जैस्वाल हा आझाद मैदानासमोर ग्राऊंड्समनसोबत एका तंबूत तब्बल तीन वर्षे राहत होता. सुरुवातीला तो एका दूध डेअरीत झोपायचा, पण तिथून त्याला जाण्यास सांगितल्यानंतर पर्याय नसल्याने तंबूत झोपण्याचा निर्णय यशस्वीला घ्यावा लागला.
 
भदोहीत त्याचे वडील एक छोटा व्यवसाय चालवायचे. पण दोन मुलांना सांभाळण्यात त्यांना अडचण यायची. शिवाय, यशस्वीला क्रिकेटमध्ये करिअर बनवायचं होतं. त्यामुळे त्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्यावर आक्षेप घेतला नाही.
 
मुंबईत आल्यानंतर यशस्वी आपले काका संतोष यांच्याकडे वरळीत गेला. पण त्यांचं घर फारसं मोठं नसल्यामुळे तिथे त्याची सोय झाली नाही. एका डेअरीच्या दुकानात त्याची झोपायची सोय झाली होती. पण तेही नंतर सोडावं लागलं. त्यामुळे त्याने मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांना विनंती करून तंबूत राहण्याची परवानगी मिळवली.
 
आझाद मैदानात भरवल्या जाणाऱ्या रामलीला कार्यक्रमादरम्यान तो पाणीपुरी विक्रीचं काम करायचा. यातून त्याला चांगले पैसे मिळायचे. त्याचा वापर तो क्रिकेट साहित्य खरेदी करण्यासाठी तसंच उदरनिर्वाहासाठी करायचा.
 
यशस्वी केवळ 11 वर्षांचा असताना त्याने भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. याच स्वप्नाने त्याला नेहमी प्रेरणा दिली. पुढे मुंबईचे अंडर-19 संघाचे प्रशिक्षक सतीश सामंत यांनी यशस्वीमध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये हेरली.
 
ज्वाला सिंह यांच्या रुपात यशस्वीला चांगला गुरु लाभला. या गुरुच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीने दमदार वाटचाल केली आहे.
 
यशस्वी केवळ 17 वर्षांचा असताना त्याची सुरुवातीला मुंबई अंडर-19 आणि नंतर भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली. अखेर, अविरत मेहनतीनंतर भारतीय संघात निवड होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
 
धोनीला केला होता नमस्कार
2020 आयपीएल हंगामात यशस्वीने धोनीला हात जोडून नमस्कार केला होता. तो नमस्कार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
 
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान लढत होती. मॅचपूर्वी टॉससाठी चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि राजस्थानचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ पिचपर्यंत गेले.
 
टॉस झाला आणि दोन्ही कॅप्टन्स परतू लागले. धोनीला पाहून प्रत्येकजण हाय फाईव्ह देऊ लागला. न्यू नॉर्मलनुसार हातांच्या मुठी पंचसारख्या करून नमस्कार चमत्कार होतात.
 
धोनी समोर आल्यावर यशस्वीच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण मोठ्या प्लेयरला भेटल्याचं समाधान त्याच्या डोळ्यात दिसत होतं. सगळे हाय फाईव्ह देत होते. धोनीला पाहून यशस्वीने गुरुजींना करतात तसा रीतसर हात जोडून नमस्कार केला, धोनीने नीट पाहिलं आणि छानसं स्माईल दिलं. धोनी चाळिशीत आलाय. यशस्वी विशीत आहे.
 
धोनीने करिअरमध्ये असंख्य युवा खेळाडूंनी संधी दिलेय, त्यांच्या कठीण काळात ठामपणे मागे उभा राहिलाय, खेळत असताना सल्ला दिलाय. असे असंख्य यशस्वी धोनीने पाहिलेत. यशस्वीसाठी ही सुरुवात आहे. या टप्प्यावरून हरवून जाणारेही खूप आहेत. मोठ्ठा पल्ला गाठायचाय पण अजूनतरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो स्थित्यंतराचा क्षण होता.
 
अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढलं तेव्हा...
मैदानावर खेळाइतकंच तुम्ही कसं खेळता हेही महत्त्वाचं आहे हे दाखवून देत दुलीप ट्रॉफी फायनलच्या लढतीत वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अनोखा पायंडा पाडला. रहाणेने स्वत:च्या संघातील खेळाडू यशस्वी जैस्वालवर शिस्तभंगाची कारवाई करत मैदानाबाहेर काढलं.
 
कोयंबतूरचं एसएनआर कॉलेज ग्राऊंडचं मैदान. दुलीप ट्रॉफीचा अंतिम मुकाबला. वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा मुकाबला. पाचव्या दिवशी सामना जिंकून जेतेपदावर कब्जा करण्यासाठी वेस्ट झोन आतूर.
 
द्विशतकी खेळी साकारत वेस्ट झोनला दमदार स्थिती गाठून देणाऱ्या यशस्वी जैस्वालला कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळताना शिस्त महत्त्वाची हा धडा घालून दिला.
 
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा साऊथ झोनची स्थिती 154/6 अशी होती. जिंकण्यासाठीचं 529 धावांचं प्रचंड लक्ष्य. वेस्ट झोनला जिंकण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता.
 
वेस्ट झोनकडून तनुश कोटियन आणि शम्स मुलानी हे फिरकीपटू बॉलिंग करत होते. यावेळी युवा यशस्वी जैस्वाल फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता.
 
फलंदाजांच्या अगदी जवळच फिल्डिंग करणाऱ्या यशस्वीने साऊथ झोनच्या फलंदाजांना उद्देशून काहीतरी बोलल्याचं स्पष्ट झालं. फलंदाजांनी यासंदर्भात अंपायर्सकडे तक्रार केली. अंपायर्सनी वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी चर्चा केली. रहाणेने यशस्वीला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याला समजावलं.
 
थोड्या वेळानंतर फलंदाज आणि यशस्वी यांच्यात बाचाबाची झाली. रहाणेने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याने यशस्वीच्या दंडाला धरून सुनावलं. शांतपणे फिल्डिंग करण्याचा सल्ला दिला. अंपायर्सनी रहाणे, दोन्ही फलंदाज यांच्याशी बातचीत केली.
 
प्रकरण निवळलं असं वाटत असतानाच रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेर जाण्याची सूचना केली. कर्णधाराच्या आदेशानुसार यशस्वीने मैदान सोडलं. काही षटकं पॅव्हेलियनमध्ये काढल्यानंतर यशस्वी मैदानात परतला.
 
यावेळेस रहाणेने त्याला फॉरवर्ड शॉर्ट लेगऐवजी त्याला फिल्डिंगसाठी दूर उभं केलं.
 
खेळाडूपेक्षा खेळ मोठा आहे आणि मैदानावर खेळताना मर्यादेत राहून शेरेबाजी करावी हा वस्तुपाठ रहाणेने यशस्वीसमोर ठेवला.
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आईच्या डोक्यात वरवंटा घालून मुलाने केली हत्या, आरोपी मुलाला अटक