मुंबई: सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव भाजपाच करण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी केला. जर या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व घटनेला भाजप जबाबदार राहिल, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मराठा समाजाचे लाखांचे मोर्चा निघाले. त्या मोर्चा दरम्यान ४२ जण हुतात्मा झाले, तर हजारो आंदोलनकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या बाजूने सरकार असून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ, असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र त्यापैकी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता आजवर झाली नाही. त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करित आहोत. तसेच या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आता आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत या भाजप सरकारला त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ज्या मराठा समाजाची भाजप सरकारने फसवणूक केली आहे. त्याच भाजपात उदयनराजे हे गेले असून भाजपकडून उदयनराजे यांची पोटनिवडणुकीत फसवणूक होण्याची शक्यता आहे,” असे सावंत म्हणाले. “उदयनराजे यांना विजयी करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जर या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाल्यास राज्यभरात गंभीर परिस्थिती निर्माण होईल आणि सर्वाना भाजप जबाबदार राहिल,” असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे हे निवडून आले. या निवडणुकीला काही दिवस होत नाही, तोच उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता २१ तारखेला साताऱ्यात पोटनिवडणूक होणार आहे.