मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.
दरम्यान, सत्ता स्थापन करायची की नाही, याचा निर्णय उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला.
या संघर्षाचा अद्याप शेवट झालेला नसला व युती तुटलेली नसली तरी या स्थितीत राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिल्याने पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. तो मंजूर करत राज्यपालांनी नवी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास फडणवीस यांना सांगितले. त्यानुसार फडणवीस सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.