राज्यातील ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या विशेष बैठकीत शिवसेनेचे सहा मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सत्तास्थापनेवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.
शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन तणाव असताना या बैठकीला विशेष महत्त्व आले होते. ओला दुष्काळाबाबत घेतलेल्या या बैठकीला रामदास कदम, दीपक केसरकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे उपस्थित होते. बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना-भाजपा यांच्यातील सत्तास्थापनेवर, मंत्रिपदाच्या वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारमध्ये एक सुकाणू समिती असावी आणि त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असावेत, असा एक प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले आहे. तर काही अटी आहेत, पण शिवसेना पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.