भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. सोमवारी (दि.११) संध्याकाळपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यपालांनी सत्ता स्थापनेच आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेसमोर आता खरे आव्हान आहे. शिवसेनेकडे बहुमतासाठी पुरेसा आकडा नाही. त्यामुळं शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेणं गरजेचे आहे. फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेनं शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार अशी भूमिका घेतली होती. सरकार स्थापने बाबत शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक सुरु असून शिवसेना खा. संजय राऊत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीला भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे समजते आहे. काँग्रेसच्या ४४ आमदारांपैकी ३० आमदार शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते आहे.