राज्याच्या परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नसून, आम्ही वाट पाहात आहोत, भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला असून, त्यांनी लवकर सरकार स्थापन करावं. शिवसेना खासदार संजय राऊत हे कोणताही प्रस्ताव मला दिलेला नाही, राष्ट्रवादी-काँग्रेस जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेण्यास तयार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात सर्वाधिक चर्चेत असलेल्या शरद पवार यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष होते. पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवार नवीन घोषणा करतील असे चित्र माध्यमांनी तयार केले होते.
शरद पवार म्हणाले की शिवसेना-भाजपने लवकरात लवकर सरकार बनवावं. त्यांना सत्तास्थापनेची संधी मिळाली आहे. भाजप सेनेची 25 वर्षांची युती आहे, ती ते तोडतील असं वाटत नाही. आम्हाला विरोधात बसायची संधी दिली आहे, आम्ही ती नीट निभावू, अशी हमीसुद्धा पवारांनी दिली आहे. त्यांनी पुढे पावसाबद्दल म्हणाले की मी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार असून, ती स्थिती पाहून केंद्राकडून मदत मिळवायचा प्रयत्न करेन. विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने या विमा कंपन्यांची बैठक घ्यावी, त्यांना सूचना द्याव्यात, असंही पवारांनी यावेळी सुचवल आहे.