Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

Makar Sankranti Special Thali
, सोमवार, 13 जानेवारी 2025 (06:39 IST)
महाराष्ट्र विशेष भोगीच्या थाळीत विशेष पदार्थ असतात. जसे की भोगीची भाजी, तिळ घालून बाजरीची भाकरी, मसालेभात किंवा खिचडी, गुळाची पोळी आणि इतर.. यापैकी आपण आपल्या आवडी आणि सोयप्रमाणे पदार्थ तयार करु शकतात. तर चला जाणून घेऊया काय साहित्य लागेल आणि कशा प्रकारे पदार्थ तयार करता येईल त्याची कृती-
 
भोगीची भाजी-
साहित्य: 1 चिरलेला बटाटा, 1 मध्यम आकाराचं चिरलेलं वांगे, 1 चिरलेलं गाजर, अर्धी वाटी ताजे मटार, अर्धी वाटी हिरवे हरभरे, 1 मोठा चमचा भिजवलेले शेंगदाणे, 1 मोठी शेवगाची शेंग (लांब काप केलेली). 2 चमचे तिळकूट, 2 चमचे चिेंचेला कोळ, 1 मोठा गूळ, - मोठा चमचा ओलं खोबरं, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल
 
कृती: पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. यात शेंगदाणे, ताजे मटार, हिरवे हरभरे, बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून वाफा काढाव्या. नंतर वांगं आणि गाजर घालून जरा पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. भाज्या शिजत आल्यावर चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा. शिजल्यावर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.
 
बाजरीची भाकरी- 
साहित्य: 250 ग्रॅम बाजरीचे पीठ, चिमूटभर मीठ, कोमट पाणी, आवश्यकतेनुसार तूप, 
 
कृती: बाजरीच्या पिठात मीठ मिक्स करून कोमट पाण्याने हे पीठ मळुन गोळा बनवून घ्यावा. 10-15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेऊन दया मग आता भिजवलेला गोळा चांगला मळुन त्याचे गोळे तयार करून घ्या. पोळपाटावर बाजरीचे थोडेसे पीठ टाकून एक गोळा ठेवा हाताने थापून भाकरी बनवा. मग भाकरी तव्यावर टाका व वरच्या बाजूने पाण्याचा हात फिरवावा. आता भाकरी दुसऱ्या बाजुने शेकली गेल्यावर पहिल्या बाजूने पलटवून दोन्ही बाजुने शेकुन घ्या. तसेच आता तवा काढून भाकरी गॅस वर चांगल्याप्रकारे शेकुन घ्या. भाकरी छान फुलल्यावर त्यावर तूप लावा व गरम गरम भाकरी सर्व्ह करा. 
 
चविष्ट खिचडी-
साहित्य: एक कप तांदूळ, 1/2 कप मुगाची डाळ, अर्धा कप मटार, 1/2 इंच आल्याचा तुकडा, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो, एक लहानसा तुकडा दालचिनीची काडी, पाच काळी मिरी, एक तमालपत्र, अर्धा  टीस्पून जिरे, दोन मोठे चमचे तूप, चिमूटभर हिंग, 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे कोथिंबीर, आवश्यकतेनुसार पाणी 
 
कृती: भोगी विशेष खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये तूप घालावे व तूप गरम झाल्यानंतर नंतर त्यात जिरे, हिंग, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि घालून चांगले परतून घ्यावे. आता हळद, टोमॅटो, मिरची तुकडे, आले आणि मटार घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये मुगाची डाळ, तांदूळ, तिखट आणि मीठ घालावे. आता पाणी घालून आणि झाकण बंद करावे. यानंतर कुकरमध्ये तीन शिट्ट्या येऊ द्याव्या नंतर गॅस बंद करावा. कुकर थंड झाल्यानंतर खिचडी प्लेट मध्ये काढून त्यावर तूप घालावे व वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तसेच तुम्हाला आवडत असल्यास खोबरे किस देखील गार्निश करू शकतात. तर चला तयार आहे आपली भोगी विशेष चविस्ट खिचडी रेसिपी, गरम गरम सर्व्ह करा. 
 
गुळाची पोळी- 
गुळ पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : अर्धा किलो गुळ (चिकीचा गुळ नसावा), तिळाची पूड- अर्धी वाटी, डाळीचे पीठ- अधी वाटी, 10 वेलदोडे, तेल- अर्धी वाटी, कणिक, तेलाचे मोहन- पाव वाटी 
 
गुळाच्या पोळीची कृती: तीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या. तिन्ही पाऱ्या जरा जरा लाटून पहिल्या पारीवर गुळाची पारी नंतर पुन्हा कणकेची पारी ठेवा. किंचित कडे दाबून पातळ पोळी लाटा. पोळी चांगली खमंग भाजून घ्या.
 
विशेष टिपा: 
गुळाच्या पोळीसाठी तयार केलेलं गुळ एक महिनाभर टिकतं.
गुळाच्या पोळ्या देखील साधारण पाच दिवस तरी चांगल्या राहतात.
पोळी लाटताना गुळ बाहेर येऊ नये याची काळजी घ्यावी.
पोळी भाजताना तव्यावर चमच्याने थोडेसे तेल किंवा तूप सोडता येतं.
पोळी तव्यावर फुटल्यास फडकं पाण्यात भिजवून तव्यावरून फिरवून घ्या ज्याने पुढच्या पोळीला डाग पडत नाही.
भाजलेल्या पोळीवर तुपाचा गोळा घालून सर्व्ह करता येतं किंवा तव्यावरच तुप लावून पोळी भाजता येते.
या व्यतिरिक्त आपण तिळाची चटणी, कढी, तिळगुळाचा लाडू देखील तयार करु शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!