अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देशात एकमेव आहे. मंदिरात आल्यावर कुठे ही व्यावसायिकपणा दिसून आला नाही. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. खान्देशातील दोंडाईचा हे माझे आजोळ आहे. आणि याच खान्देशात हे मंदिर असल्याचा मला अभिमान आहे. असे मत मराठी चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांनी व्यक्त केले.
श्री मंगळ ग्रह मंदिराला गुरुवारी अभिनेत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सायली पाटील यांचे वडील नरेंद्र पाटील, आई सुनीता पाटील, मामा डॉ. जितेंद्र देसले यांनी परिवारासह मंगळदेवाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, हेमंत गुजराती, पुषंध ढाके, मनोहर तायडे यांच्या हस्ते सायली पाटील यांचा सत्कार झाला.
अभिनेत्री सायली पाटील म्हणाल्या की, दोडाईचा येथे मामाच्या गावी आली होती. त्यामुळे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात येण्याचा योग आला. आजवर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी व्यावसायिकपणा दिसून आला. व्यवसायिकपणामुळे भाविक मंदिरापासून दूर जाऊ लागला आहे. मंगळ ग्रह मंदिरात येण्यापूर्वी वाटलं होतं व्यवसायपणा असेल, मात्र कुठेही व्यवसायिकपणा दिसला नाही. ही बाब खरच कौतुकास्पद आहे. मंदिराकडून भाविकांना पूरविल्या जाणाऱ्या सोयी - सुविधा, नैसर्गिक वातावरण तसेच मंदिर परिसरात केलेले सुशोभीकरणामुळे मन शांती लाभली असेही त्या म्हणाल्या.
भविष्यात योग आला तर नक्की प्रयत्न करणार
माझ्या आजोळमध्ये देशातील एकमेव मंगळ ग्रह मंदिर आहे. याची माहिती मला यापूर्वी मिळाली असती तर मी नक्की भेट दिली असती. भविष्यात चित्रपट किंवा मालिकेत मंगळ ग्रह मंदिर दाखविण्यासाठी नक्की प्रयत्न करीन असे ही अभिनेत्री सायली पाटील यांनी सांगितले.
सायली यांनी साकारलेल्या भूमिका
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत झुंड, घर बंदूक आणि बिर्याणी यासोबतच असं माहेर सुरेखबाई या मालिकेत भूमिका साकारलेली आहे.