जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाडी करणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत, अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, त्यामुळे कृपया तुमचं उपोषण थांबवा, लढा थांबवू नका, अशी विनंती संभाजी भिडेंनी जरांगेंचा हात हातात घेऊन केली.
मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या चौदा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे. त्यांच्या याच उपोषणास्थळी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहे. दरम्यान, याच उपोषणास्थळी संभाजी भिडे यांनी देखील भेट दिली असून ते अंतरवाली गावात दाखल झाले आहे. यावेळी संभाजी भिडे हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहे.
दरम्यान, त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. जरांगे यांची भूमिका 101 टक्के योग्य आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत. तर आरक्षणाचा उद्देश पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचा आग्रह हा सत्याग्रह आहे. उपोषण थांबवा पण लढाई थांबू नका. शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धुरंदर आहेत. हवं ते मिळून देण्याची जबाबदारी मला द्यावी. पण ,जरांगे यांनी आता उपोषण थांबवावं असे संभाजी भिडे म्हणाले.
आता माघारी येऊ नयेत
15 दिवस होऊन गे ले असून जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. आत्ताच काय तो निर्णय द्या असा जरांगे यांचं म्हणणं आहे. पण काही समजून घ्याव लागते, त्यानुसार पाऊल टाकावे लागते. त्यामुळे आपण उपोषण थांबवू या पण लढा थांबवयाचा नाही. तसेच मी जरांगे यांच्यासोबत असून, त्यांनी स्वप्नात देखील संशय घेऊ नयेत. तसेच मराठा आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते मिळवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा कायम ठेवण्यासाठी सर्व पातळीवर जीवाचा आकांत करून प्रयत्न करू यात, त्या सर्वच प्रयत्नाचा आत्ताच निकाल येणार नाही पण जसे जसे चालत राहू तसे त्याचे रूप प्रगट होईल. मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांच्याच नेतृत्वाखाली चालावे हे माझे वैयक्तिक मत आहे. ते करत असलेले प्रयत्न उत्तम असून, माघारी येऊ नयेत. तसेच युद्धातील डावपेच म्हणून उपोषण थांबवलं पाहिजे तसेच तो कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे भिडे म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor