Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Hanuman aarti in marathi
, शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (07:35 IST)
श्री हनुमंताची आरती
 
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |
कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी |
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||
 
जय देव जय देव जय श्रीहनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ||
दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द |
थरथरला धरणीधर मनिला खेद |
कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद |
रामी रामदास शक्तीचा शोध ||2||
 
जय देव जय देव जय श्रीहनुमंता ||
-श्री रामदास स्वामी

जय देवा हनुमंता । जय अंजनी सुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ धृ. ॥
वानररुपधारी । ज्याची अंजनी माता ॥
हिंडती वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ।
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिलीं कथा ॥ १ ॥
सीतेच्या शोधासाठीं । रामें दिधली आज्ञा ॥
उल्लंघुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ।
शोधूनी अशोकवना। मुद्रा टाकिलि खुणा ॥ २ ॥
सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिलें । मारिला अखया दारूण ॥
परतोनी लंकेदरी । तंव केले दहन ॥ ३ ॥
निजवळें इंद्रजित । होम करीं आपण ॥
तोही त्वां विध्वंसिला लघुशंका करून ।
देखोनी पळताती ॥ महाभूतें दारूण ॥ ४ ॥
राम हो लक्षुमण । जरी पाताळीं नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेशे केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजीं मर्दिले ॥ ५ ॥
देउनि भुभु:कार । नरलोक आटीले ॥
दीनानाथा माहेरा त्वां ॥ स्वामिसी सोडविले ॥
घेऊनि स्वामी खांदी । अयोध्येसी आणिलें ॥ ६ ॥
हनुमंत नाम तुझें । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वठायी । हारोहारीं अंबरा ॥
एका जनार्दनीं ॥ मुक्त झाले संसारा ॥ ७ ॥

अघटित भीमपराक्रम जय जय हनुमंता ।
अंजनिबालक म्हणविसी अपणा बलवंता ॥
उपजत किलाणमात्रें आक्रमिसी सविता ।
रावण गर्वनिकंद कपिबलयदातां ॥ १ ॥
जय देव जय देव जय मारूतीराया ब्रह्मासुखामृतसागर वंदित मी सदया ॥ धृ. ॥
दुर्घटसागर उडोनी सीतेची शुद्धी ।
मर्दुनी जंबूमाळी करिसी सद्‌बुद्धी ॥
भवलंकापुर जाळुनि नावरसी युद्धीं ।
रघुपतिनिजकार्याची करिसी तूं शुद्धी ॥ जय. ॥ २ ॥
जिंकिसी विषयसमुद्रा पवनात्मज रुद्रा ।
निजजनदु:खदरिद्रा पळविसी तूं भद्रा ॥
कपिकुलमंडणचंद्रा हरिं हे जडचंद्रा ।
सुखकर यतिवर वंदित मौनी पदमुद्रा ॥ जय. ॥ ३ ॥

माया शोधाविषयीं तरलासि समुद्रा ।
मध्यें भयंकरीला करिसी ह्रच्छिद्रा ॥
नमुनि श्रीला देसी दशरथीमुद्रा ।
लंका जाळूनि येसी एकादशरुद्रा ॥ १ ॥
जय देव जय देव जय मारुतिराया ।
जगदुद्धार कराया येसी या ठाया ॥ धृ. ॥
रुदन करी राम तया बहुसुखिया केला ।
सेतू बांधुनि सकपी नेशी लंकेला ॥
दशवदनदिक मारुनि आणिलि सीतेला ।
दासा बिभीषणाला लंकापति केला ॥ जय. ॥ २ ॥
ती कीर्ति तव अतुला वर्णिल कोण जनी ।
तरले दु:खसमुद्री बहू नर तव भजनीं ॥
सत्वर पावसी ऎसें कथिलेंसे सुजनीं ।
तव दर्शनवियोगे निरसे भ्रम रजनीं ॥ जय. ॥ ३ ॥
राहावें ममह्रुदयी सदया कपिराया ।
अखिलहि अधिव्याधी निर्मुल कराया ॥
मन्मन निर्मल व्हावें निस्पृह विचाराया ।
न जसा विलंब उदकी लवणास विराया ॥ जय. ॥ ४ ॥
या देही या नयनीं ब्रह्मचि खेंळावे ।
ज्ञानाग्नीनें संचित सर्वहि जाळावें ॥
क्रियामाणहि बाधेना ऎसे बाळावे ॥
नारायणदासा तव चरणीं पाळावें ॥ जय ॥ ५ ॥

सुखि निद्रा करी आतां स्वामि बलभीमा श्रीगुरु स्वामी बलमीना जालीसे बहु निशि आतां ध्यावें विश्रामा ॥धृ॥ देवा ॥
सीतेच्या शोधासि केलें लंकेसी जाण ।
मारुनि जंबूमाळी केले रावणदंडण ॥ देवा ॥
लीलामात्रें पुच्छालागीं अग्नि लावून ।
अर्धक्षणामाझारि केलें लंकेचें दहन ॥१॥
समुद्राच्या वरुते वेगि बांधुनि सेतूला ।
दशकंधरपुरिवरुते जाउनि चढविला हल्ला ॥ देवा ॥
लक्ष्मणाच्या साठीं उचलुनि द्रोणाचळ नेला ।
रामाचें निजसाह्य करुनिया विजयो मेळविला ॥ देवा ॥
जाउनिया पाताळीं लोटुनि दिधलें देवीला ।
महिरावण घेउनिया पायाखालीं रगडीला ॥ देवा ॥
निरंजन विलासि रघुविर संतुष्ट केला ।
कीर्ती जयजयकार तुमचा त्रैलोकीं जाला ॥ देवा ॥३॥

जयदेवजयदेव जयजय हनुमंता । आरति ओवाळू तुज वायु सुता ॥धृ॥
अंजनीच्या उदरीं प्रगटुनिया जाण ।
उन्मतांचि क्षणीं केलें उड्डाण ।
स्पर्शुनिया रविमंडळ जालें से येण ।
अगाध तवगुणमहिमा न कळे विंदान ॥१॥
दशरथतनुजाची तनु होतां विखंडा ।
द्रोणाचळ उचलुनिया नेता प्रचंडा ।
मार्गीं सहजीं त्याचा पडलासे गुंडा ।
तो हा पृथ्वीवरुते शोभे जरांडा ॥२॥
रघुवीराचे चरणीं ठेवुनीया प्रीती ।
त्रैलोक्याचे ठायीं वाढवीली ख्याती ॥
सद्भावें नीरंजन करितो आरती ।
पूर्णकटाक्षें ईक्षण करि त्याच्या वरुती ॥३॥

जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण - महिमा ॥धृ॥
वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥
सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
द्रोणाचळ गिरि अणिला । बंधु लक्ष्मण वांचंविला ॥३॥
निरंजन तवपायीं । भावें ठेवित येउनि डोई ॥४॥

जयदेव जयदेव जय अंजनितनया ॥ आरति बोवाळूं तुज करुणानि लया ॥ध्रु०॥
अभिवन प्रतापमहिमा न बोलवे वाणी ॥ फळ म्हणवुनियां धरिला बाळपणीं तरणी ॥
अहिरावण महिरावण मारुनिया दोनी ॥ आणिला रघुविर केली अघटित हे करणी ॥१॥
शत योजन एका उडुअणें उदधी ॥ लंघुनि क्रौंचा वधिलें अगणीत बळबुद्धी ॥
लंकाप्रवेश करुनी दशमुख अतिक्रोधी ॥ राक्षस गांजुनि केली त्वां सीताशुद्धी ॥२॥
अशोकवन विध्वंसुनि वनचर निर्दळिले ॥ लंका जाळुनि पुच्छें रजनीचर छळिले ॥
श्रीरामासह सैन्य कपिगण तोषविले ॥ म्हणती भीम पराक्रम हनुमंतें केले ॥३॥
रामानुजसह सेने शक्ती लागतां ॥ द्रोणागिरि आणिला तो रवि-उदय नव्हतां ॥
अमृतसंजीवनी देउनियां त्वरितां ॥ संतोषविले दशरथसुतमहिजा-कांता ॥४॥
महारुद्रा हनुमंता देवा बलभीमा ॥ प्रियकर दास्यत्वें तूं होसी श्रीरामा ॥
शिव शंकर अवतारी निस्सीम सीमा ॥ नि:संगा निजरंगा मुनिमनविश्रामा ॥५॥

कोटीच्या ही कोटी गगनीं उडाला ।
अचपळ चंचल द्रोणाचळ घेउनि आला ॥
आला गेला आला कामा बहुतांला ।
वानर कटका चुटका लावुनियां गेलां ॥ १ ॥
जय देव जय देव जयजी बलभीमा ।
आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा ॥ धृ. ॥
उत्कटबळ तें तुंबळ खळबळली सेना ।
चळवळ करितां त्यासी तुळणा दीसेना ॥
उदंड किर्ती तेथें मन हें बैसेना ।
दास म्हणे न कळे मोठा कीं साना ॥ २ ॥

जय जय अंजनिबाला । पंचारति ही करितों तुजला ॥ धृ. ॥
सीताशुद्धिस्तव जावोनी ॥ जाळीली लंका ।
दुष्ट वधोनी ॥ जानकिसह रामाला ।
नेसी अयोद्धे सुखधामाला ॥ जय. ॥ १ ॥
चरणी शरण मी भावें आलो । ब्रह्म सदोदित ह्र्दयी खेळो ॥
ऐशा दे ज्ञानाला । धन्य करी या बलवत्कविला ॥ जय. ॥ २ ॥

जयजय श्रीबलभीमा , मारुति अंजनिच्या नंदना हो ।
राक्षसकुळ हानना, अनाथनाथा करुणाघना हो ॥धृ०॥
सीता विरहें दुःखित, सीता सीता आक्रंदत हो ।
पंपातीर्थ तटाकिं, रघुविर पाहिला अवचित हो ।
तो प्रभु सद्‌गुरु केला, भावें होऊनि शरणांगत हो ।
निश्‍चय पण आदरिला, सीता शुद्धीचा संकेत हो ।
दक्षिणपंथें उडाला, टाकुनि मागें प्रभंजना हो ॥जय० ॥१॥
शोध सितेचा केला, क्रोधें जाळुनि लंकापुर हो ।
रामेश्‍वर लिंगापुढें, जाणों लाविला कापूर हो ।
राक्षस वधितां वहाती, तद्रक्‍ताचे तुंबळ पुर हो ।
नादें अंबर गर्जे, बहु भय वाटे दिग्गज मना हो ॥जय० ॥२॥
क्षणमात्रें शतकोटी, पर्वत उपडी बाहूबळें हो ।
फाटे धरणी तटाटे, हालवी ब्रह्मांड लांगुलें हो ।
राक्षस म्हणती भक्षक शिक्षक झाली गोलांगुलें हो ।
आत्मा कुलक्षय पाहुनि, रावण मोडित शत अंगुलें हो ।
प्राणमित्र म्हणे टाकुनि, अहिमहि गेले यमसदना हो ॥जय ३॥
पडतां रणिं लक्षूमण, वेगें द्रोणागिरी आणिला हो ।
चार वेळ रात्रींतून, गेला आला गेला अला हो ।
सीता हरतां मरतां, भरतां सरतां जय पावला हो ।
राम सिता सौमित्रा मारुति सप्राण भावला हो ।
भवबाधेची तोडी, विष्णूदासाची कल्पना हो ॥जय० ४॥

जयजय महावीर धीर चिरंजिव, मारुती बलभीमा ।
जनकसुता-भय-शोक-निवारण,कपिगण-विश्रामा ।
दशकंधर पुर दाहक प्रियकर, दाशरथी रामा ॥जयजय॥धृ.॥
जन्मतांचि पुढें नवल देखिलें, रक्‍तवर्ण नयनीं ।
बाळ क्षुधित तें फळ म्हणुनि बळें, झेंपावें गगनीं ।
ग्रहणकाळ खग्रास केतुवत, रवि घालि वदनीं ।
समर करुनि अरि अमर भासिले, करितां संग्रामा ॥जय० १॥
कडाडिलें ब्रह्मांड झोकितां, क्रोधें उड्‌डाण ।
क्षणमात्रें तळ मुळ उत्पाटुन, आणिला गिरि द्रोण ।
लक्ष्मणासह मृत रणकपिचा, जीवविला प्राण ।
खळ राक्षसकुळ सकळ धाडिलें, रविनंदन-धामा ॥जय० २॥
वज्रतनू घनशाम विराजे, तेज प्रखर तरणी ।
अटिव जेठि निट कटि कासूटी, कुंडलेंदु करणी ।
मुगुट गळा हार भार डोलती, नुपुर द्वय चरणीं ।
सजल नयन पुट जलज वदन शशि, सज्जन सप्रेमा ॥जय० ३॥
दुर्घट संकटें कोटि लोपतीं, देतां बुभुःक्कार ।
करुणासागर नत जनिं वागवि, ब्रीद अहंकार ।
विष्णुदास कर जोडुनि नमना, करि वारंवार ।
चरण गुणार्णव अगणित वर्णन, न कळे तव सीमा ॥जय० ४॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही