कोल्हापूर गेल्या काही महिन्यापासून बंद असलेल्या कोल्हापूर-बेंगळूरु या मार्गावर 13 जानेवारी 2023 पासून विमानसेवा सुरु होत आहे. बेंगळूरुसह कोल्हापूर- कोईमतूर या मार्गावर सुध्दा रोज उडाण होणार आहे. इंडिगो कंपनीकडून ही सेवा देण्यात येणार असून यामुळे उद्योग-व्यापारासाठी चालना मिळणार आहे.
इंडिगो कंपनीने 20 डिसेंबर रोजी कोल्हापूर -बेंगलोर आणि कोल्हापूर- कोईमतूर व्हाया बेंगलोर या विमान उडाणाची अधिकृत घोषणा केली. 13 जानेवारी 2023 पासून दररोज उडाण होईल असे इंडिगो कंपनीचे व्यवसाय प्रमुख विनय मल्होत्रा यांनी जाहीर केले आहे. कोल्हापूर- बेंगलोर या मार्गावरील विमानसेवा गेल्या काही महिन्यापासून बंद होती. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्याकडे या मार्गावर पुन्हा विमानसेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे नवीन वर्षात कोल्हापूरातून बेंगळूरु आणि कोईमतूर या मार्गावर विमानसेवा सुरु होत आहे. बेंगळूरु येथून दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी उडाण होऊन कोल्हापूरात दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी उतरणार आहे. कोल्हापूरातून दुपारी 5 वाजता उडाण होऊन सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे. कोईमतूर येथून दुपारी 1 वाजता उडाण होऊन कोल्हापूरात दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर कोल्हापूरातून दुपारी 5 वाजून 5 मिनिटांनी उडाण होऊन रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी कोइमतूरला पोहोचणार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor