वर्षभरात महावितरणची जवळपास चार हजार कोटी रुपयांची वीज चोरी होत आहे. तर दुसरीकडे महावितरणकडून वितरित केलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे बिलही पुरेश्या प्रमाणात वसूल होत नाही. परिणामी महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. अशा कठीण आर्थिक परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी कंपनीतील सर्वच घटकांनी परस्परांकडे बोट दाखवण्याऐवजी हातात हात घालून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.
महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या नाशिक येथे झालेल्या वसुली कार्यशाळेचे उदघाट्न करताना ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष श्री. नागोराव मगर, सरचिटणीस श्री. जहिरोद्दीन सय्यद, महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, एकलहरे प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती रंजना पगारे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. बी. टी. राऊत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सभासद व महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार म्हणाले, सन 2013-14 पासून कंपनीची आर्थिक घसरण होण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात वीज चोरी, वसुलीचे कमी प्रमाण व वाढत चाललेल्या थकबाकीमुळे उत्तरोत्तर कंपनीची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत आहे. महावितरणकडून जाणाऱ्या प्रत्येक युनिट विजेचा हिशेब लावून वितरित केलेल्या विजेच्या बिलाची वसुली करणे म्हणजेच संबंधित कार्यालयांना दिलेले उद्दिष्ट असते. परंतु ठरवून दिलेले उद्दिष्ट्यही सध्या साध्य होत नाही. तर वर्षभरात कंपनीची जवळपास चार हजार कोटी रुपयांची वीज चोरी होत आहे. ग्राहकांना वितरित करण्यासाठी खरेदी केलेल्या विजेचे पैसे 45 दिवसांच्या आत वीज निर्मिती कंपनीला अदा करणे आवश्यक असते. ही मर्यादा ओलांडल्यानंतर थकीत रकमेवर साडेबारा टक्के व्याज द्यावे लागते. यातून कंपनीवरील आर्थिक बोझा वाढत आहे. महावितरणकडून महाजनको या एकाच वीज निर्मिती कंपनीला सात हजार कोटी रुपये देणे बाकी आहेत.
ते म्हणाले, प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने वितरित केलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचा हिशेब लावून त्याचे बिल वसूल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात कंपनीतील सर्वच घटकांनी प्रामाणिकपणे योगदान देण्याची आवश्यकता असून वसुलीत कामचुकारपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सर्वांनी संघटीतपणे काम केल्यास दोन महिन्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमानंतर एकलहरे प्रशिक्षण केंद्रात आयोजित बैठकीत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील वसुलीच्या कामाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.