Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गौतम अदानी बनले एनडीटीव्हीचे सर्वांत मोठे भागधारक

gautam adani
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (09:27 IST)
आशियातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीतील 29.18 टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्ष अधिग्रहणानंतर आणखी 26 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव ठेवला.
 
एएमजी मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडसह विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी एनडीटीव्हीचे प्रत्येकी 4 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1.67 कोटी भागभांडवली समभागांच्या अधिग्रहणासाठी प्रति समभाग 294 रुपयांची किंमत देऊ केली आहे.
 
एनडीटीव्हीच्या विद्यमान भागधारकांना उद्देशून करण्यात आलेल्या या खुल्या प्रस्तावाची जेएम फायनान्शियल लिमिटेडद्वारे घोषणा करण्यात आली. अधिग्रहणकर्त्यांच्या वतीने या समभाग खरेदीचे व्यवस्थापन जेएम फायनान्शियलकडून पाहिले जात आहे.
 
अदानी एंटरप्रायझेसच्या एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेज व्हीसीपीएलमध्ये 100 टक्के खरेदी केली आहे.
 
अदानी समूहाने हेही स्पष्ट केलं की 114 कोटी रुपये खर्चून त्यांनी व्हीसीपीएलची खरेदी केली. वीसीपीएलकडे एनडीटीव्हीची एक प्रमोटर कंपनी आरआरपीआर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडचे 29.18 टक्के इक्विटी शेअर होते.
 
एनडीटीव्हीच्या प्रमोटर्सनी आरआरपीआरच्या माध्यमातून आपल्या हिश्श्याच्या बदल्यात 2009 मध्ये कर्ज घेतलं होतं. हे कर्ज 10 वर्षांसाठी होतं. 2019 मध्ये या कर्जाची मुदत संपली.
 
तीन कंपन्या एकत्रित येऊन देणार प्रस्ताव
एएमएनएल आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड यांच्यासह व्हीसीपीएल या तीन कंपन्या एनडीटीव्हीत आणखी 26 टक्के समभाग विकत घेण्यासाठी खुला प्रस्ताव आणणार आहेत. हा खुला प्रस्ताव 294 प्रतिशेअर भावाने असणार आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा 20 टक्के कमी असा हा प्रस्ताव आहे.
 
मंगळवारी एनडीटीव्हीचे शेअर दिवसअखेर 366 वर रुपयांवर स्थिरावले होते. 26 टक्के अतिरिक्त समभाग खरेदी करण्यासाठी अदानी समूहाला 493 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
 
दुसरीकडे एनडीटीव्हीने एक्सचेंजला सांगितलं की "व्हीसीपीएलने अदानी समूहाशी असलेल्या संबंधांबाबत माहिती दिली नाही. एनडीटीव्हीचे संस्थापक आणि कंपनीला हे स्पष्ट करू इच्छिते की व्हीसीपीएलने कर्ज इक्विटीत बदलण्यासाठी केलेला अधिकाराचा वापर आम्हाला कोणतीही कल्पना न देता, चर्चा न करता केलेला आहे. आमच्या सहमतीविना हा निर्णय झाला आहे. आम्हाला आजच या घडामोडीविषयी कळलं आहे. आम्ही कालच एक्सचेंजला सांगितलं की संस्थापकांच्या हिस्सेदारीत कोणताही बदल नाही."
 
एनडीटीव्हीत संस्थापक प्रणॉय रॉय यांची 15.94 टक्के तर त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांची 16.32 टक्के भागीदारी आहे. प्रणॉय आणि राधिका हेच आरआरपीआरचे प्रमोटर होते. या कंपनीकडे एनडीटीव्हीचे 29.18 टक्के समभाग होते.
 
शेअर बाजारचं नियंत्रण करणाऱ्या सेबीच्या नियमांनुसार देशात लिस्टेड असणाऱ्या कोणत्याही कंपनीचे 25 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के समभाग खरेदी करण्यासाठी खुला प्रस्ताव आणणं आवश्यक असतं. जेणेकरून कंपनीचे मायनॉरिटी शेअर होल्डर आधीपासून निर्धारित किमतीला आपले शेअर मर्जीने नव्या गुंतवणूकदाराला विकू शकतात.
 
अग्री ट्रेडिंग आणि पोर्ट्स या माध्यमातून गौतम अदानी यांनी सर्वाधिक संपत्ती असणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. अदानी यांनी एअरपोर्ट, डेटा सेंटर, सिमेंट, वीज, कोळसा, गॅस ट्रेडिंग यांच्यासह खाद्यतेल क्षेत्रातही जोरदार वाटचाल केली आहे.
 
अदानी समूहाने यंदाच्या वर्षीच डिजिटल बिझनेस न्यूज प्लॅटफॉर्म क्विंटिलियन बिझनेस मीडियामध्ये 49 टक्के समभाग विकत घेतले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच अदानी समूहाने एनडीटीव्ही खरेदी केलं असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यामुळे एनडीटीव्हीचे शेअर अनेक महिने वधारले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ganesh Chaturthi 2022 बीएमसीने मुंबईतील गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, या नियमांचे पालन करणे बंधनकारक