सोन्याचे दर दिवसेंदिवस रोज नवा रेकॉर्ड रचत आहेत. देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकर्मनामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे. सोन्याच्या किमती वाढण्याचे महत्वाचे कारण देखील हेच आहे. मुंबईमध्ये देखील सोन्याच्या किंमतीमध्ये खूप जास्त वाढ होत आहे. सोन्याचे दर आज विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव प्रति तोळा 54 हजार 828 रुपये झाले आहेत. हे दर जीएसटीसह आहेत.
24 तासात तब्बल 3 हजाराने वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे भाव याच पटीने वाढत राहिले तर दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्लीतील सराफा बाजारात देखील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 905 रुपयांनी वाढले होते. यानंतर सोन्याचे भाव 52,960 रुपये प्रति तोळा या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. तर चांदीचे भाव मात्र सोमवारी उतरले होते. चांदीमध्ये मोठी घसरण सोमवारी पाहायला मिळाली. सोमवारी चांदी प्रति किलेो 3,347 रुपयांनी कमी झाल्यामुळे काल चांदीचे भाव 65,670 रुपये प्रति किलो होते.
जाणकारांच्या मते सध्या कोरोनाच्या संकटकाळात (#coronavirus) गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे. सोन्याचांदीमध्ये केलेली गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानण्यात येते. परिणामी सध्या सोन्याचांदीच्या किंमती उच्च स्तरावरच राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीनमध्ये वाढणाऱ्या तणावाचा देखील सोन्याचांदीच्या किंमतीवर परिणाम होत आहे.