चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी निर्मिती करण्यावर ही कंपनी भर देणार असून याद्वारे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली.
अमेरिकेतील जनरल मोटर्स व चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स कंपनीमध्ये प्रकल्प हस्तांतरणाबाबत झालेल्या करारानुसार जीडब्ल्यूएम कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार आहे. पुण्याच्या तळेगावमध्ये टप्पा क्रमांक १ मध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात जीडब्ल्यूएम कंपनी महाराष्ट्रात सुमारे पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असून दोन हजार जणांना रोजगार देणार आहे. हावल इंडिया नावाने ही कंपनी कार निर्मिती करणार आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीची निर्मिती ते करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी निर्मिती करणारी देशातील ही पहिली कंपनी ठरणार आहे. दरम्यान, कंपनीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.