Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयकर विभागाची फसवणूक; ऑनलाईन परताव्याचे १७ कोटी हडपले

आयकर विभागाची फसवणूक; ऑनलाईन परताव्याचे १७ कोटी हडपले
औद्योगिक वसाहतीतील दहा कंपनी आणि निमसरकारी विभागातील सुमारे १,८८८ कर्मचाऱ्यांचे कपातीचे बनावट प्रकरणे सादर करत अॉनलाईन परताव्याचे पैसे घेत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या ठकाने गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून आयकर विभागाला तब्बल १७ कोटींना गंडवले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तीन वर्षे हा महाठक आयकर विभागाच्या डोळ्यात धुळ फेकत होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यात काही शासकीय कर्मचारी तसेच कामगारांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर धनराज किसन बोराडे (वय ४६, रा. शुभसिद्धी अपार्टमेंट, राजलक्ष्मी हॉलजवळ, धोंगडे मळा, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात किशोर रामचंद्र पाटील (रा. फ्लॅट नंबर २०१, शकुंतला पार्क, संभाजी चौक, नाशिक) याच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम ४०६, ४२०, ४६५, ४७१ व १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कटाद्वारे नाशिकमधील बॉश, सिएट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, ग्राफाईट, गायत्री पेपर या कंपन्या तसेच इंडिया सिक्युरीटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, वीज वितरण, एचएएल या शासकीय कार्यालयातील एकूण एक हजार ८८८ कर्मचाऱ्यांची बनावट प्रकरणे सादर करत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अॉनलाईन परताव्याचे पैसे घेत गंडवण्यात आले आहे.
 
या कर्मचाऱ्यांचे २०१६, २०१७, २०१८ व २०१९ निर्धारण वर्षाचे स्वतंत्र आयकर विवरणपत्र तयार केले. आयकर कायद्याच्या गृहसंपत्तीपासून नुकसान प्रकरण ६ ए चे ८० सी, ८० डी, ८० डीडी, ८० ई, ८० जी, ८० जीजी या कलमांखाली कटकारस्थान रचून बनावट कपात दाखविली. या बनावट कपातीची ऑनलाईन एनओसी सीपीसी बेंगळुरू येथे दाखल केली.
 
सदर दाव्यामध्ये कर्मचार्‍यांच्या नावे शासनाकडून साधारणत: १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपये मूळ परतावे व्याजासह घेतले. ही  रक्कम हडप करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच या कर्मचार्‍यांकडून परतावा रकमेच्या २० टक्के रक्कम फी म्हणून रोख स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनातून मिळणार्‍या उत्पन्नामध्ये फेरफार करून कमी वेतन दाखविण्यात आले. यात आयकर विभाग तसेच कर्मचाऱ्यांना गंडवण्यात आले आहे.
 
संशयित किशोर पाटील याने अनोखी मोडस् अॉपरेंडी वापरत एकाचवेळी शासन, कामगार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना गंडवले आहे. त्याच्या या गुन्हेगारी पद्धतीची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही रक्कम व्याजासह परत करण्याचे तसेच वेळ पडल्यास तीन पट दंड भरण्याची वेळ आता या फसवणूकीने कर्मचाऱ्यांवर आली आहे. संशयित किशोर पाटील हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून ‘माऊथ पब्लीसिटी’ चा वापर करत त्याने कर्मचाऱ्यांमध्ये जाळे विणत आपले उखळ पांढरे केले. विशेष म्हणजे वर्षाहून अधिक काळ त्याचा हा गोरख धंदा अव्याहतपणे सुरूच होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, १८ ला मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेचा रोडशो