करोनाच्या नव्या प्रकाराने भारतातही पाऊलं ठेवलं असून भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. “ब्रिटन व भारतादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेल्या विमानसेवेला ७ जानेवारी २०२१ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कडक नियम पुन्हा लागू केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच माहिती जाहीर करण्यात येईल,” असं पुरी यांनी ट्वीट केलं आहे.
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार वेगानं पसरत असल्याचं समोर आल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनबरोबर हवाई वाहतूक बंद केली. भारतानेही ३१ डिसेंबरपर्यंत हवाई सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.