म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ पुन्हा एकदा वाढला असून यात इक्विटी म्युच्युअल फंडांनी बाजी मारली आहे. जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 21 हजार 921 कोटींची गुंतवणूक झाली असून मागील 10 महिन्यातील ही उच्चांकी गुंतवणूक आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'ने (एएमएफआय)जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात एकूण 21 हजार 921 कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी 8 हजार 532 कोटींची गुंतवणूक 'एसआयपी'च्या माध्यमातून झाली.
'एसआयपी'ला गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत असलचे 'एएमएफआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस वेंकटेश यांनी सांगितले. इक्विटी म्युच्युअल फंडांतील ' डीव्हीडंड यिल्ड फंड' आणि 'व्हॅल्यू फंड' या दोन योजनांची कामगिरी वगळता इतर योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही योजनांमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. 'एसआयपी'तील गुंतवणुकीने 3 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यात जानेवारी महिन्यात 7 हजार 846 कोटींची भर पडली. एसआयपीत 3 लाख 35 हजारकोटींची मालमत्ता आहे.