मुंबईतील वरळीच्या कोळीवाड्यात राहणार्या ममता उमानाथ शेट्टी एका ऑनलाईन साईटवरून खरेदी केलेली साडी आवडली नाही म्हणून ती परत करण्यासाठी गृहणीला चक्क ३८ हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला
ममता यांनी काही आठवड्यांपूर्वी एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून दीड हजार रुपये किमतीची साडी विकत घेतली होती. कंपनीने ममता यांना साडी घरपोच पाठवली. ममता यांनी साडीचे पैसे रोख दिले. मात्र, त्यांनी साडीचे पार्सल उघडून बघितले असता त्यांना साडी न आवडल्यामुळे त्यांनी ती परत करण्यासाठी ‘गुगल’वर ज्या ऑनलाईनवरून साडी मागवली त्यांचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर फोन केला व खरेदी केलेली साडी पसंत नसल्याने साडी परत करून पैसे परत मागितले. कस्टमर केअरमधून बोलणार्या व्यक्तीने ममता यांच्याकडे त्यांचा एटीएम कार्डच्या शेवटी असणार्या सहा डिजिटची माहिती मागितली. प्रथम ममता यांनी माहिती देण्यास नकार दिला असता तुम्ही माहिती दिली नाही तर आम्ही तुमचे पैसे कसे परत करणार, असे सांगून ममता यांच्या कार्डची माहिती आणि बँक खाते क्रमांक घेतला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या खात्यातून चार वेळा वेगवेगळी रक्कम असे एकूण ३७ हजार ९९९ रुपये काढल्याचे मेसेज ममता यांच्या मोबाईल फोनवर आले.