Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरबीआयकडून सीकेपी बँकेला दणका; ४८५ कोटींच्या ठेवी संकटात

आरबीआयकडून सीकेपी बँकेला दणका; ४८५ कोटींच्या ठेवी संकटात
मुंबई , शनिवार, 2 मे 2020 (10:31 IST)
दादरमध्ये मुख्यालय असलेल्या सीकेपी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेने मोठा दणका दिला आहे. या बँकेचा परवाना गुरुवारी रात्री अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे बँकेच्या सुमारे ११ हजार ५०० ठेवीदारांच्या ४८५ कोटींच्या ठेवी संकटात आल्या असून सुमारे १ लाख २० हजार खातेदारांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
दादरमध्ये मुख्यालय असलेल्या सीकेपी बँकेचा १०३ वर्षांचा इतिहास आहे. सीकेपी बँकेचा तोटा वाढल्यामुळे आणि रोख मूल्यात मोठी घट झाल्याने बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयने २०१४ मध्ये निर्बंध घातले होते.

त्यानंतर या बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी ठेवीदारांनीही प्रयत्न केले. त्यामुळे तोटा कमी होत असतानाच रिझर्व्ह बँकेने सीकेपी बँकेचा परवानाच रद्द करत ठेवीदारांना मोठा धक्का दिला. बँक पुन्हा उभी राहावी, यासाठी ठेवीदारांकडून प्रयत्न सुरू होते. ठेवीदारांनी व्याजदरात कपात करून घेत व्याजदर २ टक्क्यांपर्यंत आणले. स्वत:च्या ठेवी भागभांडवल म्हणून परावर्तित केल्या. अन्य बँकांप्रमाणे बँकेला आर्थिक मदत मिळाल्यास बँक वाचू शकेल, यासाठी सरकारला अनेक पत्रे पाठविण्यात आली. शिवाय उच्च न्यायालयात हा विषय मांडण्यात आला आहे. ठेवीदारांनी प्रयत्न केल्यानेच मार्च २०२० अखेरपर्यंत बँक नफ्यात आली.

संचित तोटा असल्याने ताळेबंद तोट्यात दिसतो. पण वास्तवात बँक पुनरूज्जीवन होण्याच्या स्थितीत नक्कीच आहे. तसे असतानाच रिझर्व्ह बँकेने ही कारवाई करून ठेवीदारांवर अन्याय केला आहे, असे बँकेच्या ठेवीदार फोरमचे अध्यक्ष व माजी संचालक राजू फणसे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किम जोंग उन निरोगी आहेत, 20 दिवसांनी बहिणीसोबत‍ दिसले