दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अकबर अलीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी संघाने विजेतेपद प्राप्त करत इतिहास घडवला. मात्र, 18 वर्षीय बांगलादेशी कर्णधारासाठी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. आपल्या लाडक्या बहिणीच्या निधनाचे दुःख विसरुन अकबर अलीने वाघासारखा खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.
बांगलादेशमधील आघाडीच्या दैनिकांनी दिलेल्या बातमीनुसार, अकबर अलीची बहीण खादीजा खातूनचे 22 जानेवारी रोजी प्रसूतीवेळी निधन झाले. मात्र, अकबरवर या गोष्टीचा परिणा होऊ नये यासाठी त्याच्या घरच्यांनी ही गोष्ट त्याला कळू दिली नाही. मात्र, काही दिवसांनी त्याला ही बातमी समजली, तो त्याच्या बहिणीचा एकदम लाडका होता. त्याच्या वडिलांनी प्रसिध्दीमाध्यमांना ही माहिती दिली.
आम्ही सुरुवातीला या गोष्टीबद्दल सांगायचे नाही असे ठरवले होते. मात्र, त्याला ही गोष्ट समजली आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने मला फोन केला आणि मला ही गोष्ट का सांगितली नाही असे विचारले. पण ही गोष्ट त्याला सांगावी एवढ बळ माझ्या अंगात त्यावेळी नव्हते, त्याला काय सांगू हेच समजत नव्हते, त्या प्रसंगाची आठवण काढताना अकबरचे वडील हळवे झाले होते.
अंतिम सामन्यात रवी बिष्णोईने 4 बळी घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडले होते. मात्र अकबर अलीने संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आज जगभरात अकबर अली आणि बांगलादेशच्या संघाचे कौतुक होत आहे, मात्र हे कौतुक पाहण्यासाठी अकबरची बहीण आज सोबत नाही ही सल त्याचा मनात कायम राहील.