गृहनिर्माण क्षेत्राला लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील ग्राहकही संकटात आहेत. यामुळे गृहकर्जदरात ५ टक्के घट करण्याची मागणी समाचार फाउंडेशनने पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.रीअल इस्टेट उद्योग हा जीडीपीमध्ये जवळपास आठ टक्के योगदान देतो. अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटकांपैकी एक असलेल्या या क्षेत्राला आता करोना काळात मात्र मोठा फटका बसला आहे. रीअल इस्टेट उद्योग हे कृषिक्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. जवळपास सहा कोटी रोजगार या क्षेत्रात गुंतला आहे.
रीअल इस्टेट क्षेत्रावर जवळपास तीनशे उद्योग अवलंबून असल्यामुळे या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेला पुनर्संजीवनी देण्याची क्षमता आहे. करोनामुळे या क्षेत्राला फटका बसला असताना अर्थव्यवस्थेच्या पुनर्निर्माणासाठी विकासक संस्थेने एक-वेळ कर्ज पुनर्रचना, गृहखरेदीदारांना सक्षम करण्यासाठी गृहकर्ज व्याजदरामध्ये ५ टक्क्यांपर्यंत घट, प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यासाठी रेरा मुदतीमध्ये वाढ, नवीन प्रकल्पांसाठी जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये वाढ करावी, आदी मागण्या समाचार फाउंडेशनकडून करण्यात आल्या आहेत.