साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वर्तवले आहे.
पुढील वर्षी केंद्र सरकारने ठरवून दिलेला उसाचा दर देणेही कारखान्यांना शक्य होणार नाही, असे पवार म्हणाले. साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठे संकट उभे राहणार आहे. मोठ्या प्रमाणात झालेले उसाचे उत्पादन मात्र मंदावलेली जागतिक बाजारपेठ यामुळे पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळेल, असे पवार म्हणाले.
जगातल्या साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्यामुळे जागतिक बाजारपेठ मंदावली आहे. त्याचे परिणाम भारतातील साखर उद्योगांना भोगावे लागत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. बाराती येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते.
शेतकरी आणि संशोधकांच्या जोरावर आयात करणारा देश म्हणून असलेली ओळख मिटवून आपला देश निर्यात करणारा बनला आहे.
अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.