Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात झाला मोठा निर्णय

ST bus
, गुरूवार, 21 जुलै 2022 (15:23 IST)
एसटी कर्मचाऱ्यांना आता आपले वेतन खाते खासगी बँकेतदेखील उघडता येणार असून, एसटी महामंडळाच्या शिफारशीनुसार ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते हे फक्त भारतीय स्टेट बँक आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को – ऑपरेटिव्ह बँक या दोनच बँकांमध्ये होते. आता मात्र एसटी महामंडळाच्या शिफारशीमुळे कर्मचाऱ्यांना खासगी बँकेत देखील खाते सुरु करण्याचा पर्याय मोकळा झाला आहे.
 
एखाद्या कर्मचाऱ्यांचे बचत खाते एसटी महामंडळाच्या वतीने शिफारस करण्यात आलेल्या आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक आणि एचडीएफसी बँक या तीन बँकापैकी एका बँकेत असेल तर एसटी कर्मचारी त्या बचत खात्याचे रुपांतर हे वेतन खात्यात करू शकतात. ही सर्व प्रक्रिया त्यांना वैयक्तिक पातळीवर करावी लागणार आहे. शिवाय, आरटीजीएस आणि एनईएफटीसाठी लागणारा आकार हा एसटी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा फटका हा भारतीय स्टेट बँक आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकांना बसण्याची शक्यता आहे.
 
भारतीय स्टेट बँकेकडून ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्यांना इतर खासगी बँकांमध्ये वेतन खाते उघडण्यापूर्वी स्टेट बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. जर स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेतले असल्यास किंवा उचल ‘ओव्हर ड्राफ्ट’ घेतले असल्यास खासगी बँकेत खाते उघडण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्याला स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेकडूनसुद्धा ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही वैयक्तिक कर्जासाठी एसटी महामंडळ जबाबदार राहणार नसल्याचे देखील प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका