Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऊसावरील घोणस अळीची दहशत : अळीच्या दंशानंतर करावयाच्या उपाययोजना विषयी थोडक्यात माहिती

ऊसावरील घोणस अळीची दहशत : अळीच्या दंशानंतर करावयाच्या उपाययोजना विषयी थोडक्यात माहिती
, गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (15:12 IST)
नंदुरबार : काही दिवसांपासून ऊसाच्या पिकावर एक अळी आढळून येत आहे. स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी आणि ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून ती ओळखली जाते. या अळीचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले आहेत. त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती दिसून येते तसेच त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले असल्याने घोणस अळी बाबतची माहिती, अळीच्या दंशानंतर करावयाच्या उपाययोजना विषयी थोडक्यात माहिती…
 
अळीची ओळख :-
या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत.
म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्वः संरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या कीडीला अकाली आपला स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.
 
येथे आढळते :-
ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये ही आढळून येते.
खाद्य वनस्पती :-
ही बहुभक्षी प्रकारातील कीड आहे. विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते.
 
पिकांसाठी किती धोकादायक :-
ही अळी पिकाचे फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते.
 
दंश झाल्यास :-
या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात. त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात, दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो.
 
विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरुपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या अॅलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, अॅलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत.
 
ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार :-
काही तज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.
 
अळीचे नियंत्रण :-
कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. तरी सर्वांनी कोणत्याही “केसाळ” किंवा “काटेरी” अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशोक चव्हाणांची ती क्लीप व्हायरल केली तर त्यांची अडचण होईल