Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा नॅनो : वेळ आणि राजकारणाची बळी ठरलेली रतन टाटांची ‘लाडकी’ इलेक्ट्रिक अवतार घेऊन येणार?

टाटा नॅनो : वेळ आणि राजकारणाची बळी ठरलेली रतन टाटांची ‘लाडकी’ इलेक्ट्रिक अवतार घेऊन येणार?
, मंगळवार, 10 जानेवारी 2023 (16:35 IST)
10 जानेवारी 2008ची ही गोष्ट. दिल्लीच्या कुडकुडत्या थंडीचा तो एक दिवस, जेव्हा प्रगती मैदानात दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये सर्वांमध्ये उत्सुकता होती, की टाटा मोटर्स आज काय वेगळं दाखवणार.
तोवर टाटांच्या ताफ्यात सुमो, सियारा, सफारीसारख्या दणकट SUV, इंडिका-इंडिगोसारख्या प्रवासी गाड्या होत्या. मात्र आजचा दिवस अपेक्षांचा होता.
 
कारण होतं कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी मांडलेली एक कल्पना – एक सर्वसामान्यांसाठी छान गाडी बनवायची, साधारण लाख रुपयात येईल अशी. आज हीच कल्पना सत्यात उतरतेय का, याचीच सर्वांना प्रतीक्षा होती.

अखेर रतन टाटा मंचावर दाखल झाले, एका खरोखरंच छोट्या, टुबुकदार गाडीत. दिसायला गोगलगायीच्या आकाराची, पण क्यूट. नाव होतं नॅनो. किंमत? वचन दिल्याप्रमाणे एक लाख रुपये! हेडलाईन्ससाठी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा आकडा पुरेसा होता. अनेकांनी पहिल्या गाडीचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तर काहींनी घरातली दुसरी गाडी म्हणून नॅनो बुक केली.
 
पण बुकिंग ते गाडीच्या डिलेव्हरीपर्यंत परिस्थिती बदलत गेली, आणि त्यासोबतच नॅनोची वाटचालही.

नॅनो कशी बनली?
खरंतर एक लाखाची गाडी आणण्याची कल्पनाच जरा रंजक, आव्हानात्मक आणि अतिशयोक्तीची वाटत होती. पण टाटांनी काही वर्षांपूर्वीच टाटा एस नावाचा एक मिनी ट्रक बाजारात आणला होता.
 
‘छोटा हत्ती’ अशा टोपणनावाने त्याची जोरदार मार्केटिंग केल्यावर टाटांना यश आलं.
 
याच यशाची पुनरावृत्ती करायला ‘एस’चे निर्माते, मराठमोळे गिरिश वाघ यांच्या नेतृत्वात एक तरुण टीम टाटा मोटर्सने स्थापन केली.
 
आणि त्यांच्यापुढे रतन टाटांच्या कल्पनेतली नॅनो साकारण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं.
2018च्या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये गिरीश वाघ यांनी बीबीसी मराठीला तेव्हाची गोष्ट सांगितली होती :
 
“तेव्हा कंपनीमध्ये नॅनो प्रकल्पावर काम सुरू झालं होतं. मग आमचे अध्यक्ष रतन टाटा आणि कार्यकारी संचालक रवीकांत, दोघे मला म्हणाले की तू आता नॅनोवर काम कर.
 
आपल्यासाठी हा प्रोजेक्ट सर्वांत महत्त्वाचा आहे. त्यानंतर नॅनोवर जवळजवळ पाच वर्षं काम चाललं. पूर्ण कार कोऱ्या कागदावर डिझाईन करण्यापासून ते नवीन कारखाना उभारण्यापर्यंत बराच वेळ लागला.”
 
सुरुवातीचं नॅनोचं रूप हे एखाद्या चार चाकी रिक्षासारखंच होतं – त्याची बॉडी प्लास्टिक किंवा कागदाची करता येईल का, याचाही विचार सुरू होता. अखेर हलक्या ॲल्युमिनियमपासून नॅनोची बॉडी आणि तीन-सिलेंडर इंजनसुद्धा बनवण्यात आलं.
 
सिंगूर ते साणंद
2006मध्ये नॅनोचा प्लांट पश्चिम बंगालच्या सिंगूरमध्ये उभारण्यात आला.
 
त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करण्यात आली, अख्खी फॅक्टरी उभारण्यात आली आणि या प्रकल्पात नॅनो निर्मितीचं कामही सुरू झालं होतं.
 
पण मग शेतकऱ्यांनी केलेलं तीव्र आंदोलन, त्याचं ममता बॅनर्जी यांनी केलेलं नेतृत्व, यामुळे हा प्रकल्प बारगळला.
अखेर या विरोधाला कंटाळून तसंच कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका पाहता, टाटा मोटर्सने सप्टेंबर 2008मध्ये सिंगूर प्लांट बंद केला आणि ते नवीन ठिकाण शोधू लागले.
 
तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी टाटांना नॅनोचा तो कारखाना गुजरातच्या साणंदमध्ये आणण्याची ऑफर दिली.
 
सिंगूर ते साणंद हे अंतर जवळजवळ 2,000 किमी. आणि अख्खा कारखाना पूर्वेकडून अगदीच पश्चिमकडच्या राज्यात हलवायला लागणार होता वेळ, पैसा आणि खूप मोठी कसरत.
 
तेव्हा टाटांपुढे एकाचे तीन प्रकल्प आले :
 
एक म्हणजे अख्खा कारखाना - म्हणजे त्यातली यंत्र, कच्चा माल, इतर साहित्य म्हणजे एक-एक स्क्रूसुद्धा - सिंगरहून उचलून रस्तेमार्गे साणंदला पोहोचवायचा.

दुसरा म्हणजे, उत्तराखंडच्या पंतनगरमध्ये आणि महाराष्ट्रातल्या पुण्यात टाटांच्या दुसऱ्या कारखान्यांमध्ये तात्पुरती निर्मिती व्यवस्था उभारणे, जेणेकरून नॅनोचं उत्पादन सुरू राहील आणि बुकिंगनुसार लोकांपर्यंत गाड्या पोहोचत राहतील.

आणि तिसरा म्हणजे, साणंदमध्ये पुन्हा तो अख्खा कारखाना उभारणे, आणि निर्मिती सुरू करणे.
सिंगूर ते साणंद या स्थलांतरासाठी कंपनीला लागले एकूण 3,340 ट्रक, साधारण 495 कंटेनर्स आणि सात महिन्यांचा वेळ. अखेर 1,800 कोटी रुपयांचा हा कारखाना इकडून तिकडे गेला आणि नोव्हेंबर 2009मध्ये, म्हणजे सिंगूरमध्ये उत्पादन थांबल्यापासून 14 महिन्यांनी टाटा नॅनोचं गुजरातमध्ये उत्पादन सुरू झालं.
 
पुढे चालून नॅनोला 2009चा इंडियन कार ऑफ द इयर पुरस्कारही देण्यात आला.
 
मेगा चर्चा, नॅनो यश
जगातली सर्वांत स्वस्त कार म्हणून नॅनोने लाँचच्या वेळीच आंतरराष्ट्रीय हेडलाइन्स गाठल्या. अशीच चर्चा 1930च्या दशकात फोक्सवागनने आणलेली बीटल, 1950च्या दशकात आलेली फियाट 500च्या बाबतीतही झाली होती.
फक्त एक लाखात गाडी, म्हटल्यावर सर्वांनीच फॉर्म भरले, बुकिंग केली आणि नंतर लकी ड्रॉने लोकांपर्यंत गाडी पोहोचू लागली. पण सुरुवातीचे काही मॉडेल्स वगळता नॅनोची किंमत फार काळ एक लाख रुपये ठेवणं शक्य नव्हतं.

रतन टाटांनी दिलेलं आश्वासन ते गाडीचा लाँच, या चार-पाच वर्षांच्या काळात कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या होत्या, त्यामुळे मग टाटांनी गाडीची किंमत वाढवली.
 
या दरवाढीमुळे आता मारुती 800 आणि ऑल्टोपेक्षा ती फार काही स्वस्त राहिली नव्हती. यामुळेही अनेक जण पुन्हा मारुतीच्या पिटुकल्या गाड्यांकडे वळले.
 
शिवाय, सुरुवातीला डिलेव्हरीला झालेला उशीर, त्यानंतर लोकांच्या लक्षात आलेले गुणवत्तेचे प्रश्न नॅनोच्या अंगलट आले.
 
पहिल्या मॉडेलला धड डिक्की नव्हती, इंजिनचा आवाज यायचा आणि आतलं प्लास्टिक जरा खूपच हलक्या दर्जाचं होतं, हेही चर्चेचा विषय बनले.
 
यानंतर 2014 साली ग्लोबल NCAP या कार सुरक्षा मानांकन देणाऱ्या संस्थेने टाटा नॅनोला शून्य स्टार दिल्यामुळे, तसंच नव्या कोऱ्या गाड्यांना लागणाऱ्या आगींमुळे, तिच्या प्रतिमेला धक्का लागला – शेकडो लोकांनी बुकिंग रद्द केलं.
यादरम्यान नॅनोला नवसंजीवनी देण्यासाठी कंपनीने नॅनो ट्विस्ट आणि जेन-एक्स नॅनो सारखे नवीन मॉडेलही आणले, ज्यात अखेर उघडणारी डिक्की होती, नवीन AMT गेअरबॉक्स तंत्रज्ञान होतं. शिवाय CNGचा पर्यायही देण्यात आला होता. पण हे प्रयत्न नॅनोची विक्री वाढवायला पुरेसे ठरले नाहीत.
 
नंतर स्वतः रतन टाटा यांनी कबूल केलं की नॅनोचं मार्केटिंग फसलं होतं.
 
“जगातली सर्वांत स्वस्त कार म्हणण्याऐवजी तिला सर्वांत किफायतशीर कार म्हणायला हवं होतं,” हे टाटांचे शब्द तेव्हा गाजले होते. “ही गाडी फ्लॉप झाली, असं मला वाटत नाही. आम्ही फक्त सुरुवातीलाच मिळालेली एक चांगली संधी गमावली,” असं ते म्हणाले होते.
 
2012च्या एका मुलाखतीत बोलताना रतन टाटा म्हणाले होते, “जगातली सर्वांत स्वस्त कार बनवणं, हा नॅनोचा उद्देश नव्हताच. लोकांना परवडेल आणि लोकांना तिचं मूल्य पटेल, अशी एक गाडी आम्हाला बनवायची होती.”
 
टाटा नॅनोचा अंत आणि पुनर्जन्म?
टाटा मोटर्सने सुरुवातीला उद्दीष्ट ठेवलं होतं वर्षाला 3 लाख नॅनो विक्रीचं. पण दर वर्षी हे लक्ष्य गाठण्यापासून कंपनी मैलो दूर होती.
 
त्यातच टाटा ग्रुपची धुरा ही रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आल्यानंतर त्यांनी सर्वांत आधी टाटा समूहातले नुकसानकारक प्रकल्प बंद करायचा सल्ला दिला. आणि या सल्ल्याच्या केंद्रस्थानी होता टाटा नॅनो प्रकल्प, जो रतन टाटांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
 
याशिवाय अनेक गोष्टींवरून मिस्त्री आणि टाटांमध्ये झालेले वाद गाजले होते, ज्यानंतर मिस्त्रींची CEOपदावरून हकालपट्टीही करण्यात आली होती. मात्र पुढे कंपनीत नेतृत्वबदल झाल्यानंतर अखेर 2019च्या डिसेंबरमध्ये अखेरची नॅनो असेंब्ली लाईनवरून खाली आली.
आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात जेमतेम 3 लाख नॅनोंची विक्री केली. पण आता काही वृत्तांनुसार, नॅनो इलेक्ट्रिक अवतारात आणण्याचा विचार कंपनी करत आहे. मात्र कंपनीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही किंवा फेटाळलेलंही नाही.
 
खरंतर टाटा मोटर्सने 2010च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये नॅनो इलेक्ट्रिक अवतारमध्ये दाखवली होती. तेव्हा टाटा मोटर्सच्याच एका प्रसिद्धीपत्रकानुसार या नॅनोची रेंज 160 किमी असणार होती आणि 10 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठण्याची क्षमताही. पण त्याला आता जवळजवळ 13 वर्ष लोटली आहेत.
 
पण गेल्या वर्षी मे महिन्यात रतन टाटा खुद्द या नॅनो इलेक्ट्रिकमध्ये ताज हॉटेलमध्ये दाखल होताना दिसले होते. त्यामुळे आजही नॅनो EV अवतारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
सध्या देशात टाटा मोटर्स इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या विक्रीत आघाडीवर आहे. तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त नेक्सॉन, टिगॉर आणि टियागोंची इलेक्ट्रिक अवतारात विक्री टाटा मोटर्सने केली आहे, त्यामुळे नॅनोचा इलेक्ट्रिक अवतार आला तर त्यालाही प्रतिसाद मिळू शकतो.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SL ODI : विराट कोहलीने ODI क्रिकेटमधील 65 वे अर्धशतक झळकावले