Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कांदा प्रश्न पेटला, यामुळे भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो : शरद पवार

webdunia
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (16:51 IST)
“निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितलं. त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.
 
केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची शरद पवार यांनी भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती  सांगितली. 
 
या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळत असल्याचंही शरद पवार यांनी पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी बाबत फेरविचार करावा अशी विनंती शरद पवार यांनी गोयल यांच्याकडे केली.
 
गोयल यांनी हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर घेण्यात आला आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुन्हा निर्णय घेऊ असे गोयल यांनी स्पष्ट केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

बाप्परे, कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर