नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा करतात. हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते. जगाभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत क्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिस्तमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाते. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.
दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जात असे.
मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केला जाते. हे इस्राईल देशातील एक छोटंसं गावं आहे. ह्याच गावात ख्रिस्तांचा (प्रभू येशू) जन्म झाला. ह्या दिवशी इथून लोकं रात्रीच्या समयी मिरवणूक काढून जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात. तिथे दुसरा मिस्सा अर्पण केला जातो. नंतर दिवसाढवळी महामंदीरात सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र होतात त्यावेळी तिसरा मिस्सा अर्पण होत असे.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात. (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) असते. हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे.
या सणावर चॉकलेट केक बनवले जाते. कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंव्हा गायीचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे. हा सण लहान थोर सर्वे अति उत्साहाने आनंदाने साजरा करतात. हा सण सर्वाना एकत्र आणण्याचा सण आहे.