Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन : 'त्या' तक्रारीनंतर सिनेमांमध्ये डान्स करणं कायमचं सोडलं..

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन : 'त्या' तक्रारीनंतर सिनेमांमध्ये डान्स करणं कायमचं सोडलं..
, सोमवार, 5 जून 2023 (07:13 IST)
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचं निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या.
चित्रपटातली आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या.
 
1943 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजकपूर शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीबरोबरही त्यांनी काम केलं.
 
‘वहिनीच्या बांगड्या,’ ‘मीठ भाकर’ ‘मराठा तितुका मेळावा’ साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले गाजलेले चित्रपट आहेत.
 
सुलोचना दीदी म्हणून त्या सगळीकडे ओळखल्या जात. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 ला झाला.
 
चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. म्हणून भालजी पेंढारकरांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं.
 
ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं. मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि त्या भाषा दिव्यातून गेल्या.
 
मराठी चित्रपटसृष्टीतील मौलिक योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (1963), संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार (1968), महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ (1997), केंद्र शासनातर्फे ‘पद्मश्री’ (1999), अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रभूषण’ पुरस्कार (2003), महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (2010) पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
 
सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.
 
नाव बदलण्याचा किस्सा
भालजी पेंढारकर हे सुलोचना दीदींचे गुरू. भालजींनीच सुलोचना दीदींचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून त्यांना ‘सुलोचना’ असं नाव दिलं आणि हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रूढ झालं.
 
दिग्दर्शक भालजी पेंढारकरांकडेच त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सुलोचना दीदी भालजींना 'बाबा' म्हणायच्या.
 
अल्ट्रा मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुलोचना दीदींनी त्यांच्या नावाचा किस्सा आणि ते नाव ठेवणाऱ्या गुरूबद्दलही सांगितलं होतं.
 
सुलोचना दीदींनी सांगितलं होतं की, "भालजी पेंढारकरांसारख्या महान गुरूच्या हाताखाली मला काम करण्याचं भाग्य लाभलं. माझं मूळ नाव 'रंगू'. जयप्रभा स्टुडिओत काम करण्यास आल्यानंतर भालजींनी माझं नाव 'सुलोचना' केलं. भालजी पेंढारकरांनी आम्हाला घोड्यावर बसणं, तलवार चालवणं इत्यादी गोष्टीही शिकवलं. त्याकाळी सुद्धा त्यांनी आम्हाला एडिटिंग शिकवलं."
म्हणून सुलोचना दीदींनी सिनेमात डान्स करणं सोडलं...
'भाऊबीज' सिनेमानंतर नृत्यप्रधान सिनेमे सुलोचना दीदींनी केले नाहीत.
 
याबाबत त्यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, "एक-दोन ठिकाणी समारंभात मी गेले असता, तिथल्या लोकांनी विचारलं की, तुम्ही डान्स का करता? मग मी सांगितलं की, मी डान्स शिकले म्हणून करते. तर ते म्हणाले की, तुमचं पाहून आमच्या घरातल्या पोरीबाळी सुद्धा डान्स करायला लागतील, स्टेजवर उभ्या राहतील. ते आम्हाला कसं चालेल? मग ते ऐकून मला वाईट वाटलं. मग मी डान्स करणं सोडलं."
 
'या' 3 भूमिका करायच्या राहिल्या...
सुलोचना दीदींनी आपल्या अनेक दशकांच्या सिनेप्रवासत अनेक भूमिका केल्या. नायिकांपासून आईच्या भूमिकेपर्यंत. मात्र, तरीही शेवटच्या काळता त्यांना काही भूमिका करायच्या राहिल्याची खंत वाटत होती.
 
एका मुलाखतीत बोलताना सुलोचना दीदी म्हणाल्या होत्या की, "पेशवाईतल्या पार्वतीबाई, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी या तीन भूमिका करायच्या राहून गेल्या माझ्या. याचं मला दु:ख आहे. आता तर त्या करू शकणार नाही."
 
दादा कोंडकेंच्या आईच्या भूमिकेचा किस्सा
अभिनेते दादा कोंडकेंनी त्यांच्या पहिल्या सिनेमात म्हणजे 'सोंगाड्या' सिनेमात आईच्या भूमिकेसाठी सुलोचना दीदींना विचारलं होतं. पण सुलोचना दीदींनी नम्रपणे नकार दिला आणि त्या भूमिकेसाठी दुसर नाव सूचवलं, ते म्हणजे रत्नमाला बाई.
 
सुलोचना दीदींनी याबाबत सांगितलं होतं की, "रत्नमाला बाईंचं नाव मी सूचवलं. मग दादांनी त्यांना बोलावून घेतलं. मग त्या आल्या आणि त्यांनीच ते काम केलं. ते काम खूप गाजलं. आजही लोकांना दादांच्या आई म्हणून रत्नमाला बाईंचं नाव घेतलं जातं. इतकी ती आई गाजली."
 
चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी 'आई' हरपली - एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
एकनाथ शिंदे म्हणाले की, "पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी 'आई' ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे."
"सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः 'आई'च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसतं, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी "आई' गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी."
 
महान कलावंताला आज आपण सारे मुकलो - फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
"स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे," असंही फडणवीस म्हणाले.

Published By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Urvashi Rautela: उर्वशी रौतेला दिसणार परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये