Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंद इंगळे ‘मोगरा फुलला’मध्ये बँक मॅनेजरच्या भूमिकेत

आनंद इंगळे ‘मोगरा फुलला’मध्ये बँक मॅनेजरच्या भूमिकेत
, शुक्रवार, 17 मे 2019 (13:54 IST)
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी होणार प्रदर्शित 
 
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटात नाटक, चित्रपट आणि टेलिव्हीजन जगतातील आघाडीचा अभिनेता आनंद इंगळे एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बँक मॅनेजरची भूमिका साकारणारा आनंद चित्रपटात स्वप्नीलचा हितचिंतक आहे. त्याच्या या भूमिकेमुळे चित्रपटातील अभिनयाची बाजू अधिक भक्कम झाली आहे. ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या भूमिकेत आहे स्वप्नील जोशी. स्वप्नील या चित्रपटात सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे तर ज्या बँकेशी त्यांचा करार आहे तिथे आनंद व्यवस्थापक आहे. “बँकेतली खाती आणि आपुलकीची नाती, दोन्ही जपावी लागतात,” या टॅगलाईनसह या दोघांचे एक पोस्टर निर्मात्यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे. त्यावरून या दोघांमधील व्यावसायिक तरीही आपुलकीचे नाते अधोरेखित व्हायला मदत होते.
 
आनंद इंगळे हे मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील एक आघाडीचे नाव आहे. प्रपंच (१९९९) या मालिकेतून आनंद इंगळे प्रथम टीव्हीवर दिसला आणि त्यानंतर त्याने तिन्ही माध्यमे गाजवली. फू बाई फू, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिका आणि अ फेअर डील, माकडाच्या हाती शँपेन, वस्त्रहरण, लग्नबंबाळ, व्यक्ती आणि वल्ली, वाऱ्यावरची वरात या गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून व त्यातील विविधांगी भूमिकांमधून आनंदने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘पुलवाट’ या चित्रपटातील विनोदी भूमिकेसाठी त्याला २०११ साली राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. बालक पालक, अजब लग्नाची गजब गोष्ट, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शिक्षणाच्या आयचा घो, आंधळी कोशिबीर या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका गाजल्या. डॅडी या २०१७ साली आलेल्या हिंदी चित्रपटातही आनंद महत्वाच्या भूमिकेत होता.
 
चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंद इंगळे म्हणाला, “या चित्रपटातील बँक मॅनेजरची भूमिका वेगळी आहे. स्वप्नीलबरोबरचे हे नाते म्हटले तर व्यावसायिक आहे, म्हटले तर मैत्रीचे आहे. चित्रपटाची कथा वेगळी आहे आणि यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही तावून सुलाखून निघालेली आहे. त्यामुळे ही भूमिका करताना खूप मजा आली. प्रतिभावान अशा श्रावणीताई देवधर यांच्याबरोबर काम करताना वेगळा अनुभव मिळाला.”
 
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि आनंद इंगळे यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, संदिप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
 
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील ‘जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे. 
 
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुठे आहे नंदुरबार???