'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील 'बाप बीप बाप' या वेबसीरिजमधील वडील - मुलाच्या नात्यातील सुंदर प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या वेबसीरिजमधील 'वय नाही' हे धमाल गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जात, एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे.
'बाप बीप बाप'मध्ये वडिलांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे संगणक हाताळताना, व्यायाम करताना, आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांमध्ये मिसळताना, मुलाच्या रिलेशनशिपला स्वीकारताना दिसत आहेत. ते ज्या ज्या गोष्टी करत आहेत त्यातून दिसतेय की, वय हा केवळ एक आकडा आहे. मुलांशी समवयस्क होऊन वडिलांनी त्यांच्याशी जवळीक साधली तर हे नाते अधिक बहरू शकते, अशा पद्धतीचे हे गाणे आहे. हे गाणे प्रत्येक पालकाने ऐकावे, असे आहे. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे.
'वय नाही'या गाण्याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' हे एक धमाल गाणे असून वडील -मुलाच्या नात्याला एक नवे वळण देणारे हे गाणे आहे. वडील - मुलाच्या नात्यात नाही म्हटले तरी एक दरी असते. ही दरी मिटवून हे नाते अधिक घट्ट करण्याचा आणि या अबोल नात्यावर भाष्य करणारे 'वय नाही' हे गाणे आहे. प्रत्येक पाल्य -पालकाने पाहावी अशी ही वेबसीरिज आहे.''