मराठी 'बिग बॉस ३'च्या घरातील खेळाची रंगत आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'बिग बॉस'कडूनही आता वेगवेगळे टास्क दिले जात आहेत. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची चढाओढ सुरु आहे आणि या दरम्यान अनेक जण एकमेकांवर टीका करत आहेत. अशीच टीका सोनाली पाटीलने गायत्री दातारच्या हसण्यावर केली आहे.
मुळात गायत्री शांत आणि विनम्र स्वभावाची आहे. परंतु 'बिग बॉस'च्या चावडीवर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर गायत्रीने ठामपणे आपले मत मांडले आहे. सोनाली पाटीलच्या या नकारात्मक टीकेवर गायत्रीने तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. गायत्री दातारच्या हसण्यावर आणि तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचे असंख्य चाहते आहेत आणि असे असताना सकारात्मक बाबीवर टीका करणे कितपत योग्य आहे, असा थेट प्रश्न गायत्रीने सोनालीला विचारला. एखाद्याच्या दिसण्यावर, रंगरूपावर, अथवा अवयवावर वक्तव्य करणेच मुळात चुकीचे आहे आणि हाच मुद्दा धरून गायत्रीने सोनालीची चांगलीच शाळा घेतली तीही 'बिग बॉस'समोर. एरव्ही शांत स्वभावाची गायत्री प्रसंगी ठामपणे उभी राहू शकते, हे तिच्या या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता बिग बॅासच्या घरात टक्कर द्यायला गायत्री सज्ज झाली आहे.