ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अन्य तीन जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमिनीची विक्री करून १४ जणांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रम गोखले यांच्यावर करण्यात आला आहे.
अभिनेते विक्रम गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरोधात पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार जयंत बहिरट यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ वर्षांपूर्वी जयंत म्हाळगी आणि सुजात म्हाळगी यांनी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली होती. त्यातील गिरीवन प्रोजेक्टचे विक्रम गोखले हे अध्यक्ष आहेत. त्यांनी हा प्रकल्प सरकारमान्य असल्याचं सांगत खोटी प्रलोभनं देऊन ग्राहकांना आकर्षित केलं, असा आरोप ठेवण्यात आला आहे.