Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्नीलला 'गावला छंद'

स्वप्नीलला 'गावला छंद'
, बुधवार, 23 जानेवारी 2019 (11:39 IST)
'मी पण सचिन' चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर नंतर या सिनेमाचं 'छंद गावला' हे हळुवार आणि सुंदर नवीन गाणं रिलीज झाले आहे. सिनेमाचा नायक म्हणजेच स्वप्नील जोशी आपल्या गावातून पुण्याला येतो आणि तिथे तो क्रिकेट अकॅडमीत प्रवेश मिळवतो. त्याच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना स्वप्निलच्या मनातले अगदी अचूक भाव आणि आनंद या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. तसेच आपले स्वप्न आता सत्यात उतरणार याचा विश्वास देखील त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. शिवाय स्वप्नील सोबत प्रियदर्शन सुद्धा आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी साथ देणाऱ्या मित्राच्या भूमिकेत तो दिसत आहे. असं हे अप्रतिम गाणं हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरातील असून या गाण्याला मराठी चित्रपटसृष्टीतील त्रिकुट म्हणून ओळखले जाणारे 'त्रिनिती ब्रदर्स' यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे शब्दही या त्रिकूटानेच गुंफलेले आहेत. स्वप्नील त्याच्या ध्येयाच्या दिशेने जेव्हा प्रवास सुरु करतो त्यावेळी त्याच्या मनातील असंख्य विचार अगदी समर्पक शब्दात 'त्रिनिती ब्रदर्स' यांनी मांडले आहे. आणि या सुरेख शब्दांना अगदी साजेशी चाल आणि संगीतही त्यांनी दिले आहे. चित्रपटाची कथा गावाकडची असल्यामुळे या गाण्याचे बोलही त्याच भाषेत आहे. पण तरीही गाणं ऐकताच क्षणी मनाला भिडते. त्यामुळे शब्द कोणत्याही भाषेत असले तरी गाण्यातील भाव प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहचतात.
webdunia
या 'छंद गावला' गाण्याचे शूटिंग भोर या गावात आणि पुणे शहराजवळ झाले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी  १०-१२ दिवस लागले. 'आयला आयला सचिन आयला' या धमाकेदार गाण्याला प्रेक्षकांनी अगदी उचलून घेतले. तसाच प्रतिसाद या गाण्याला सुद्धा मिळणार यात शंका नाही. स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.
 
इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने  श्रेयश जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण