भारतात हॉलीवूडसारखे साय-फाय चित्रपट बनत नाहीत अशी नेहमीच ओरड केली जाते. लव्हस्टोरी अथवा अॅक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस निर्माते करताना दिसत नाहीत. इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि अनेको शास्त्रज्ञांची भुमी असणा-या भारतात ना साहित्यामध्ये विज्ञान कथा आढळतात ना चित्रपटांमध्ये. सायन्स फिक्शनचा आनंद भारतीय प्रेक्षकांना मिळत नाही. नेमक्या या कमतरेच्या फायदा घेत हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दर्जेदार इंग्रजी चित्रपटांच्या मोहजालात अडकवलं आहे.
अस्सल विज्ञानकथेवर आधारित 'उन्मत्त ' हा सिनेमा एक अनोख्या विषयाला हात घालतो. स्लीप पॅरलिसिस च्या संकल्पनेवर चित्रपटाचं कथानक उभं असून, आजच्या तरुण पिढीचं कुतूहल जागविणारा, वैज्ञानिक विचारधारेला दुजोरा देणारा हा सिनेमा आहे.मराठी चित्रपटांमध्ये आजपर्यंत कधीही चित्रित न केल्या गेलेल्या अशा फाईट्स, अंडरवॉटर सीन्स आणि स्पेशल इफेक्ट्स या सिनेमामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळतील.
चित्रपटाची निर्मिती राजेंद्र खैरे यांची असुन, चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन महेश राजमाने यांनी केले असुन चित्रपटात आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा दे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 22 फेब्रुवारी ला प्रदर्शित होणार आहे.