गजलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाच्या कारकीर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील मराठी – उर्दू गजलांची भावगर्भ मैफिल शनिवार दि. २७ मे, २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री. शिवाजी मंदिर, दादर येथे सादर होत आहे. या मैफिलीचे आयोजन झेन एंटरटेनमेंटच्या निर्माती – दिग्दर्शिका अश्विनी जालिंदर कांबळे यांनी श्री. छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या सहयोगाने केले असून या मैफिलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
गज़लनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकिर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील गज़लमय मैफिलीला यादगार करण्यास त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची साथ लाभणार आहे. या मैफिलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकिर्दीतील रौप्यमहोत्सवी मैफिल जिथे रंगली होती, त्याच शिवाजी मंदिरात सुवर्ण महोत्सवी मैफिलीचे आयोजन ठरले असून ही गजलनवाझ भीमराव पांचाळे आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची हृदय मैफिल दादर मुंबईकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या सुवर्णमहोत्सवी मैफिलीत गझलनवाझ पांचाळे हे 'अंदाज आरशाचा', 'आयुष्य तेच आहे', 'तू नभातले तारे माळलेस का तेव्हा', 'मी किनारे सरकताना पाहिले', 'हा असा चंद्र', 'करते थोडी स्वप्ने गोळा' अशा अनेक लोकप्रिय गझलांसह नव्या गझलाही सादर करतील. तसेच मुंबईकर रसिकांना आपली आवडती गझल ऐकण्याची फर्माईशही या कार्यक्रमात करता येणार आहे. या मैफिलीत गिरीश पाठक (तबला), सुधाकर अंबुसकर (हार्मोनियम), संदीप कपूर (गिटार), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), अब्रार अहमद (संतूर), राशिद खान (व्हायोलिन) हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. तर रवींद्र वाडकर हे या मैफिलीचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाला समाजसेवक श्री विक्रांत आचरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांची पहिली गझल मैफल सन १९७२ साली अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गेली ५० पन्नास वर्षे अथकपणे महाराष्ट्रासह देश-विदेशात गझल गायनाचे कार्यक्रम केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना करून आतापर्यंत १० अखिल भारतीय गझल संमेलने आयोजित केली, अनेक गझल लेखन कार्यशाळा घेतल्या, वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले, अनेकांना लिहिते-गाते केले, तसेच अनेक नवोदित गझलकारांच्या गझल संग्रहांचे प्रकाशन केले. आपल्या कार्याद्वारे त्यांनी आपल्या गझलगायनाला चळवळीचे स्वरूप दिले. बऱ्याच कालांतराने मुंबईत प्रथमच गझलनवाझ पांचाळे यांची मैफिल होत असल्याने गझलप्रेमी रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.