Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रिप्स : मोठ्या माणसांकडून छोट्यांसाठी सादर होणारा हा नाट्यप्रकार खास आहे, कारण...

grips
, मंगळवार, 28 मार्च 2023 (17:47 IST)
facebook
जर्मनीमधून साठच्या दशकात ग्रिप्स या नाटक प्रकारची सुरुवात झाली. लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहीलेली आणि सादर केलेली हा नाट्यप्रकार जर्मनीमधून जगभरात पोहोचला.
 
प्रेक्षक म्हणून जरी लहान मुलं असले तरिही या नाटकांचे विषय परिकथा, गंमत-जंमत आणि लहानग्यांचं मनोरंजन करण्यापलीकडे जातात.
 
लहान मुलांच्या भावविश्वातले प्रश्न, त्यांच्यसमोर येणाऱ्या अडचणी त्यांची मतं या ग्रिप्स नाटक प्रकारातून मनोरंजनात्मक पद्धतीने मांडल्या जातात.
 
भारतात आणि खासकरुन पुण्यात ग्रिप्स नाटकाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी ८० च्या दशकात केली.
 
जर्मनीतून सुरुवात
साठच्या दशकात जर्मनी दुसऱ्या महायुद्धातून सावरत होती. महायुद्धामध्ये समस्यांचा ढीग तयार झाल होता. अशाच काळात जर्मनीमध्ये एका वेगळ्या बालनाट्याचा उदय झाला. त्याचं नाव ग्रिप्स थिएटर.
 
ग्रिप्स थिएटरचे मुळ हे जर्मनीतल्या बर्लिनमधलं आहे. बर्लिनमधल्या मिटे जिल्ह्यात 1960 च्या दशकापासून ग्रिप्स थिएटरमध्ये मुलं आणि तरुणांसाठी समकालीन आणि राजकीय नाटकं विकसित करत आहे.
 
1966 साली या लहान मुलांसाठीच्या रंगभूमीची स्थापना झाली. फोल्कर लुडविग हे त्याचे सहसंस्थापक होते. ते विद्यार्थी चळवळीतले होते. त्यामुळे त्यांना लहान मुलं आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव होती.
 
लुडविग यांनी जवळपास चार दशकं ग्रिप्सचे संचालक म्हणून काम पाहिलं. व्होल्कर लुडविग यांना मुले आणि तरुणांसमोर वास्तव सादर करायचं होतं.
 
त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दाखवायचा होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना धैर्य द्यायचं होतं.
 
आजही समाजातील समस्या 'ग्रिप्स'मध्ये कलात्मकरीत्या मांडल्या जातात आणि तरुण प्रेक्षक जिथे आहेत तिथे सादर केल्या जातात.
 
ऐंशीच्या दशकात पुण्यात ग्रिप्सचा प्रवेश
1985-86 साली ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी पुण्यात ग्रिप्स नाटक प्रकार आणला.
 
ग्रिप्स नाटक प्रकाराकडे ते का आकर्षित झालं हे सांगताना डाँ मोहन आगाशे सांगतात की, "ग्रिप्स हा नाटक प्रकार विचार करायला भाग पाडेल अशा तऱ्हेची कला आहे आणि चेष्टा, विनोद, करमणुक हे सगळं करुनही ते कुठेतरी तुम्हाला विचार करायला भाग पाडतं.
 
“लहानपणापासूनच जर विचार करायची सवय लागली तर किती चांगलं होईल. हे मला प्रामुख्याने त्या ग्रिप्स थिएटरमध्ये आढळलं आणि म्हणून मी ते सुरु केलं.
 
ग्रिप्स नाटक प्रकार म्हणजे रुचकर अन्न आहे. चविष्ट आहे आणि आरोग्याला पोषक आहे. या नाटक प्रकारातून प्रभावी शिक्षण होतं. त्यातून उपदेशाचे डोज दिले जाताहेत असंही वाटायला नको.
 
ते नाटक बघून लहान मुलांना काय सापडलं ते बघायचं. ते नाटक बघून तुम्ही ठरवा. चांगलं की वाईट याचा निर्णय तुम्ही घ्या. आम्ही त्या मताचा आदर करतो.
 
तुम्ही लहान असलात म्हणून काय झालं तुमच्या मताचा आदर करतो हा ग्रिप्सच्या मागचा विचार आहे,” डॉ मोहन आगाशे यांनी सांगितलं.
 
डॉ. मोहन आगाशे यांच्यानंतर पुण्यातील ग्रिप्स नाटकाचा वारसा लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले आणि अभिनेत्री, लेखिका-दिग्दर्शिका विभावरी देशपांडे पुढे नेत आहेत.
 
“श्रीरंग गोडबोले नावाचा अतिशय गिफ्टेड मुलगा आमच्या ग्रूपमध्ये होता. तो नवीन होता. श्रीरंग खूप गोष्टी करायचा. मी त्याला विचारलं की त्याला हे नाटक आवडतंय का. त्याला हा प्रकार फारच आवडला. पहिल्यांदा आम्ही केलेली नाटकं म्हणजे 'छान छोटे वाईट मोठे, नको रे बाबा,' काही नाटकं भाषांतरितही केली,” असं डाँ मोहन आगाशे यांनी सांगितलं.
 
‘पण आम्हाला खेळायचंय’
ग्रिप्सच्या विचारसरणीचं आणि संपूर्णपणे भारतातील बनावटीचं पहिलं नाटक म्हणजे 'पण आम्हाला खेळाचंय.' श्रीरंग गोडबोले यांनी या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं आणि विभावरी देशपांडे यांनी या नाटकात रसिका नावाची प्रमुख भुमिका साकारली होती.
 
“मी अभिनेत्री म्हणून ग्रिप्सचं केलेलं पहिलं नाटक म्हणजे 'पण आम्हाला खेळायचंय'. हे संपूर्ण भारतीय बेसचं होतं. म्हणजे ते कोणत्याही जर्मन नाटकावर आधारित नव्हतं. त्याचं लेखन दिग्दर्शन भारतीय होतं. तो विषयही अत्यंत आपल्या मातीतला होता.
 
1992 साली बाबरी मस्जिद पाडल्यावर जी दंगल झाली, त्यानंतर जी दुही निर्माण झाली दोन समाजांमध्ये त्याचा लहान मुलांवर परिणाम कसा झाला याविषयी हे भाष्य करणार हे नाटक होतं. श्रीरंग गोडबोले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्यातली 10 वर्षांची रसिकाची भूमिका मी केली होती. ती माझ्या अत्यंत जवळची भूमिका आहे,” असं विभावरी देशपांडे यांनी सांगितलं.
 
विचारांचा व्यायाम आणि संवेदनाक्षम मनाची जडणघडण
ग्रिप्स नाटकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक लहान मुलांसाठी असलं तरिही त्यामध्ये मोठे लोक भूमिका करतात. यामध्ये जे विषय मांडले जातात त्याचा आशय फार खोल असतो. त्यामुळे मोठी माणसं एकत्र येऊन लहान मुलांसमोर त्याचं सादरीकरण करतात. यामुळे रुढ असलेल्या बालनाट्य या कल्पनेपेक्षा ग्रिप्सची नाटकं ही संकल्पना फार वेगळी आहे.
 
“खरंतर बालनाट्य हा माझ्या आवडीचा विषय नव्हता. पण जेव्हा मी ही कन्सेप्ट ऐकली की ग्रिप्सच्या बालनाट्यांमध्ये मोठी माणसं लहान मुलांची कामं करतात तो माझ्यासाठी सुखद आश्चर्याचा धक्का होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा विषय हा परिकथा आणि राक्षस वगैरे नसून त्यामध्ये आजच्या मुलांचं जे भावविश्व असतं त्यांच्यामधले प्रश्न त्यामधल्या गोष्टी असतात. या दोन्ही गोष्ट मला फार आवडल्या. मग मी ते करायला लागलो,” असं श्रीरंग गोडबोले यांनी सांगितलं.
 
छान छोटे वाईट मोठे, नको रे बाबा, पण आम्हाला खेळाचंय, वाय अशी नाटकं ग्रिप्सच्या विचारसरणीने तयार झाली आहेत.
 
“1986 साली मी पहिल्यांदा 'छान छोटे, वाईट मोठे' हे नाटक केलं. 1990 च्या आसपास 'नको रे बाबा' केलं. 1993 साली 'पण आम्हाला खेळायंच आहे' हे नाटक केलं.
 
1995 साली 'पहिलं पान' नावाचं नाटक केलं. त्यानंतर मी जरा गॅप घेतली. पण या दरम्यान आधी माझ्या नाटकांत काम करणाऱ्या विभावरीने बरिच काम केलं. पुन्हा एकदा मला उसंत मिळाल्यावर मी ग्रिप्सचा जंबाबुंबाबूम, वाय अशाप्रकराच्या नाटकांचं लेखन दिग्दर्शन करतोय,” असं श्रीरंग गोडबोले यांनी सांगितलं.
 
ग्रिप्स नाटकांमध्ये आता कोणकोणतं काम सुरु आहे?
आधी थिएटर अकॅडमीच्या माध्यामातून ग्रिप्स नाटक केलं जायचं. आता रेन्बो अंब्रेला या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रिप्स नाटक आणि त्याच सोबत लहान मुलांसाठी इतरही उपक्रम राबवले जातात.
 
“आमचा इथे मोठा थिएटर ग्रूप आहे. सुरुवातीला ग्रिप्स थिएटर चळवळ ही थिएटर अकॅडमीच्या मार्फत व्हायची. त्यानंतर महाराष्ट्र कल्चरल सेंटरने त्याची धुरा सांभाळली होती. मागच्या वर्षीपासून रेन्बो अंब्रेला ही आमची संस्था आहे. ती लहान मुलांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करते आहे.
 
चित्रपट, साहित्य, नृत्य, संगीत असं त्याचं काम आहे. या अंतर्गत आम्ही ग्रिप्सचं काम करत आहोत. आम्ही आमची जुनी चार नाटकं रिवाइव्ह केली. त्याशिवाय या वर्षी एक नवीन नाटक प्रेक्षकांसमोर आणायचं आहे. त्याची तयारी सुरु आहे.
 
त्याचसोबत हा प्रकार फक्त पुण्यापुरचा मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या शहरांमध्ये याची केंद्र बनवायची आहेत. म्हणजे तिथले थिएटर ग्रूप तिथल्या लोकांसाठी याचे प्रयोग करु शकतील. जर्मनीच्या ग्रिप्स थिएटर सोबत कसं कोलॅबोरेशन करता येईल याचा विचार सुरु आहे. मे महिन्यात आम्ही मोठा महोत्सव करणार आहोत. पुढच्या शैक्षणिक वर्षांत शाळा शाळांमधून याचे प्रयोग कसे होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत,” अशी माहिती विभावरी देशपांडे यांनी दिली.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्यात सोशल मीडियावर युद्ध! चाहते करत आहेत ट्रोल