बाईपण भारी देवा' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदेची जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नवीन चित्रपटाची घोषणा “आईपण भारी देवा!”
२०२३ हे वर्ष बॉक्सऑफिसवर गाजवल्यानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांनी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी, सोशल मिडिया अकाऊंटवर “आईपण भारी देवा" या एका नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
या चित्रपटाबद्दल इतर माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र खरी उत्सुकता ठरणार आहे की यातील मुख्य कलाकार कोण असणार.. आणि याची माहिती लवकरच येईल अशी अपेक्षा आहे..
गेल्या वर्षी बाईपण भारी देवा चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी गाजवली होती. महाराष्ट्राबरोबर परदेशातही या चित्रपटाचं यश साजरं केल गेलं होतं. प्रत्येक घराघरात, प्रेक्षकांच्या मनात एक विशेष, जिव्हाळ्याची जागा निर्माण करत, आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, "बाईपण भारी देवा या सिनेमाने खुप काही शिकवलं. खरतर प्रत्येक कलाकृती आम्हा कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते. पण बाईपण सिनेमा करताना आणि नंतर प्रदर्शित झाल्यावर रसिकांच्या प्रतिसादाने भारावलेपण आलं होतं. ही कलाकृती मी माझ्या आई, बायको, मुलगी, मावशी, आजी... यांच्यासाठीच केली होती. अगं बाई अरेच्चा ने स्त्रीच्या मनात काय चालतं? याचा शोध घेतला, बाईपणने स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली. यशाने जबाबदारी वाढली. मग डोक्यात एक आलं.. आईपण किती महत्वाचा नाजूक विषय आहे? एक आईच असते जी पुरूषाला जन्म देते. तीच्या भावभावना या अथांग समुद्रा सारख्या असतात.. त्यातलं ओंजळभर पाणी या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वहाणार आहे. हा सिनेमा फक्त कुणा स्त्रीसाठी नाही.. तर तो समस्त रसिकांसाठी असेल. कारण प्रत्येकाला आई असते....
मी पुन्हा एकदा जिओ स्टुडिओज सोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे ज्यांनी बाईपण भारी देवासाठी माझ्या व्हिजनवर मला पाठिंबा दिला. आईपण भारी देवा सोबत, आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आणि चिरस्थायी प्रभाव टाकणारा चित्रपट देऊ अशी आशा करतो.”
अगं बाई अरेच्चा आणि बाईपण भारी देवा नंतर केदार शिंदे आता घेऊन येत आहेत "आईपण भारी देवा"! नावाप्रमाणेच हा विषय आईपण आणि तिच्याशी संबंधित असलेल्या आपल्या सगळ्यांचाच आहे असं म्हणता येईल. मात्र यावेळेस स्त्रियांची एक वेगळी बाजू, एका वेगळ्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केदार शिंदे करतील हे नक्कीच!
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित, ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्या सह-निर्मीत "आईपण भारी देवा" चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त द्वारे करण्यात आले आहे.