मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, थिएटर अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून क्षिती जोग घराघरात पोहोचली. आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती आता मराठी सिनेसृष्टीत एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षिती आता 'चलचित्र कंपनी' च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'झिम्मा' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा क्षिती सांभाळत असून हा चित्रपट २३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासह सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला 'झिम्मा' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी सर्वांना उत्सुकता होती. टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनीच नाही तर अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे झिम्माच्या निमित्ताने हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून एकत्र काम करणार आहे.
आपल्या निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवासाबद्दल क्षिती सांगते, ''खरं सांगायचं तर निर्मिती क्षेत्रात येताना आपल्या जवळचा आपला फेवरेट विषय घेऊन यायचं असं ठरलं होतं आणि झिम्मा ने ती संधी दिली! ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याला बघायला आवडतात तसे चित्रपट आपण बनवायचे हे मी पक्क ठरवलं होतं! आता झिम्मा तयार झाल्यावर आपल्या मनासारखं घडल्याचा आनंद आहे! समाधान आहे. प्रवास आणि चित्रीकरणाच्या निमित्ताने झालेला आमच्या सात जणींचा प्रवास खरोखर खूपच रंजक होता. या निमित्ताने मला माझ्या मैत्रिणींसोबत काम करता आले. हेमंतचं दिग्दर्शन जवळुन बघता आलं. पुन्हा प्रेमात पडता आलं. निर्मिती ताई, सुहास ताई यांच्या सहवासातून बरंच काही शिकण्याची संधी मिळाली. खूप मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, या गोष्टीचा विशेष आनंद आहे. हा चित्रपटात महिला असल्या तरीही प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट आवर्जून बघावा असाच आहे.''
आज वर्षभराने इतकी मोठी स्टारकास्ट असलेला आणि धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चलचित्र कंपनी प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर इरावती कर्णिक लिखित या चित्रपटाची निर्मिती क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य धमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपाम मिश्रा यांनीही केली आहे. अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले असून संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहिले आहे.