Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महेश कोठारे यांचे वडील, अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

महेश कोठारे यांचे वडील, अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन
, शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:41 IST)
अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. श्री. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं निधन झालंय, अशी माहिती त्यांची नातसून उर्मिला कोठारेने दिली. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.
 
अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्याचेही काम त्यांनी काही काळ केले होते. कालांतराने शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत त्यांनी नोकरी केली. तब्बल चार दशके त्यांनी या बॅंकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. या बॅंकेचे भारतातर्फे प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती. अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व. नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकाच्या लेखनासाठी कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईत निमंत्रित केले होते. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक महेश कोठारेंच्या वडिलांचे निधन