Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडियोत भरणार अभिनयाची कार्यशाळा

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडियोत भरणार अभिनयाची कार्यशाळा
, बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (11:39 IST)
'बॉलीवूड थीमपार्क' म्हणून नावारूपास आलेल्या कर्जत येथील एन.डी.स्टुडियोचे वलय दिवसागणिक वाढत चालले आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या एन.डी.स्टुडियोच्या भव्य आवारात उभे असलेल्या बॉलीवूड थीमपार्कमध्ये पर्यटकांची नांदी पहावयास मिळत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा खजाना असणा-या याच स्टुडियोमध्ये आता, अभिनयाची कार्यशाळादेखील भरवण्यात येणार आहे. यासंदर्भात नितीन चंद्रकांत देसाई यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, मा. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी, निर्माते,लेखक व दिग्दर्शक एन. चंद्रा, प्राध्यापिका मंजू निचानी, सिनेदिग्दर्शक केतन मेहता आणि पत्रकार राजीव खांडेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत त्याची घोषणा करण्यात आली. भारतातील बांधकाम विभागातील अग्रेसर नाव असलेले निरंजन हिरानंदानी यांच्या हिरानंदानी इंस्टीट्युट ऑफ लर्निंगसोबत नितीन चंद्रकात देसाई, यांच्या फिल्मी दुनियेत 'फर्स्ट कट' नामक आंतरराष्ट्रीय स्तरावर फिल्म आणि मिडिया अकादमी उभारली जाणार . सिनेसृष्टीत काम करू इच्छीणाऱ्या होतकरू तरुणांसाठी कथा-पटकथा, संकलन, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, वेशभूषा, दिग्दर्शन, निर्मिती तसेच इवेंट मेनेजमेंट इ. विषयावर या कार्यशाळेत  वर्ग भरवले जाणार आहे. शिवाय, पत्रकारपरिषदेच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या जंगी पार्टीत, नितीन चंद्रकांत  देसाई यांच्या 'ड्रीम ऑफ बॉलीवूड' आणि 'ड्रीम गर्ल ऑफ बॉलीवूड' या आगामी कार्यक्रमाचीदेखील घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे. 
भारतीय चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेची रंजक सफर घडवून आणणाऱ्या या फिल्मी दुनियेत, समरसून जाण्याची नामी संधी प्रेक्षकांना मिळत आहे, नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली हि बॉलीवूड नगरी अनेक कलाकारांसाठी स्वप्नपूर्ती ठरत असून, चित्रपटसृष्टीत काम करू इच्छीणाऱ्या नवोदित कलावंतांसाठी हि कार्यशाळा दिशादर्शक ठरणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीमध्ये सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक, सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून नावाजलेले नितीन चंद्रकांत देसाई यांचा प्रवासदेखील प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे इच्छुकांनी एन.डी.स्टुडियोत किंवा पवई येथील हिरानंदानी इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंगमध्ये नक्की संपर्क साधावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धर्मेंद्र-शत्रुघ्न ही जोडी तब्बल २० वर्षानंतर एकत्र