Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Planet Talent : प्राजक्ता माळीचा 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

Planet Talent : प्राजक्ता माळीचा 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला
, सोमवार, 19 जुलै 2021 (21:16 IST)
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. या व्यतिरिक्त प्राजक्ताचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवारही तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणखी एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे 'प्लॅनेट मराठी'चा भाग असणाऱ्या 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये प्राजक्ता माळीचा सहभाग. 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाल्याबद्दल या परिवाराकडून प्राजक्ताला एक खास भेट देण्यात आली. तिचा बालपणीपासून आजवरचा प्रवास या वेळी व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला. तर प्राजक्तासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी 'प्राजक्तप्रभा'चे काव्यवाचन केले.
 
'प्राजक्तप्रभा'बाबत ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रवीण दवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, ''प्राजक्ताला आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून ओळखतोच. 'प्राजक्तप्रभा'च्या माध्यमातून ती एक कवयित्री म्हणून आपल्या समोर आली आहे. प्राजक्ताला कलाकारासोबतच कवयित्री का व्हावेसे वाटले याचे उत्तर 'प्राजक्तप्रभा'मध्ये दडले आहे. तिचे हळवेपण, संवेदनशीलता या काव्यसंग्रहातून स्पष्ट जाणवते. या झगमगत्या जगापलीकडेही कलावंतांना मन असते, भावना असतात. या भावनांना प्राजक्ताने काव्यस्वरूपात आपल्या समोर आणले आहे. प्राजक्ताच्या या नवीन प्रवासासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा. पारिजातकाच्या फ़ुलाप्रमाणेच 'प्राजक्तप्रभा'चा सुगंधही रसिकांच्या मनात कायम दरवळत राहील.''
webdunia
आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, ''कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे. संग्रहातील कविता मराठी, हिंदी आणि इंग्रजी असून त्या अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत. अजिबातच क्लिष्ट नाहीत; त्यामुळेच त्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील, भावतील, आवडतील अशी आशा आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्या अभिनयावर, नृत्यावर भरभरून प्रेम केले. वेळोवेळी मला प्रतिक्रियाही दिल्या. मला आशा आहे की, 'प्राजक्तप्रभा'लाही रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. तसेच माझ्यावर, माझ्या कवितांवर विश्वास दाखवणाऱ्या 'ग्रंथाली'सारख्या नामांकित प्रकाशनाचे तसेच 'प्लॅनेट मराठी'च्या कुटुंबात मला प्रेमाने सहभागी करून घेणाऱ्या अक्षय बर्दापूरकर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. ''
 
'प्लॅनेट मराठी'तील सहभाग आणि कवयित्री म्हणून आपल्या समोर आलेल्या प्राजक्ता माळीबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''मालिका, चित्रपट, नाटक अशा अभिनयाच्या विविध माध्यमांमधून प्राजक्ताने आपले अभिनयकौशल्य यापूर्वीच प्रेक्षकांना दाखवले आहे. एक अभिनेत्री म्हणून ज्याप्रमाणे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याप्रमाणेच एक कवयित्री म्हणूनही ती रसिकांचे प्रेम मिळवेल. आज ती 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी होत आहे. 'प्राजक्तप्रभा' आणि 'प्लॅनेट टॅलेंट'च्या माध्यमातून प्राजक्ता एका नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. यासाठी तिला खूप शुभेच्छा. आम्हाला फार अभिमान आहे, अशी अष्टपैलू अभिनेत्री आमच्या परिवारात सामील होत आहे.''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कायमची तिकिटे निघतील