झिंगाट करुन सोडणारी सैराट जोडी आर्ची-परशा आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लोणावळ्यातील सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये दिसणार आहेत. या गाजलेल्या जोडीचा मेणाचा पुतळा पाहायला मिळणार आहे.
म्युझियममध्ये येणाऱ्या पर्यटकांनी सैराट आल्यापासून आर्ची-परशा आणि नागराज मंजुळे यांचे पुतळे उभारावेत, या मागणीने सुनील कंडलूर यांना अक्षरशः भंडावून सोडलं. पर्यटकांच्या या मागणीमुळे सैराट झालेल्या सुनील यांना आर्ची-परशा आणि नागराज हे कोण आहेत याचा गंध नसताना देखील त्यांच्या मेणाचे पुतळे बनविण्याचा त्यांचा ध्यास घेतला. त्यानंतर आर्ची-परशा आणि नागराज यांच्याशी सुनील यांनी संपर्क साधला. या तिघांनी मेणाच्या पुतळ्यासाठी तयारी दर्शवली. आता तिघांचे मोजमाप घेऊन पुतळे तयार करायला सुरुवात झाली आहे.वॅक्स म्युझियममध्ये आर्ची-परशा आणि नागराजचे पुतळे उभारले जाणार म्हटल्यावर त्यांचे पुतळे कसे असणार याची पर्यटकांना उत्सुकता लागली आहे.