भारत कोरोना व्हारसच्या दुसर्याक लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्व क्रीडा उपक्रम नियंत्रणात आणले गेले आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा तयार करण्यासाठी बीसीसीआयने 29 मे रोजी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट हंगामावर (2021-22) चर्चा होणार आहे. देशातील कोरोनाचा प्रसार लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभा 29 मे रोजी होईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मागील हंगामात रणजी स्पर्धा खेळवण्यात न आल्याने बीसीसीआय यावर्षी सप्टेंबरपासून घरगुती हंगाम सुरू करण्याचा विचार करीत आहे.
2020-21च्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने होऊ शकते.