डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. भारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले.
खेळाच्या एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 183 धावा होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलिया सहज 250 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कामिगिरी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट फक्त 33 धावात गेल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोनाथन मेरलोने सर्वाधिक 76 धावा केल्या.