भारतीय संघाने डब्लिन इथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी20 लढतीत आयर्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. पावसामुळे ही लढत 12-12 षटकांची खेळवण्यात आली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 108 धावांची मजल मारली. हॅरी टेक्टरने नाबाद 64 धावांची खेळी केली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, अवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दीपक हुड्डाच्या 47 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह भारतीय संघाने 2 ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची तयारी करत आहे. चहलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. हार्दिक पंड्याने या सामन्याद्वारे कर्णधार भूमिकेत तर उम्रान मलिकने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं.