हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील शेवटचा सामना 10 गडी राखून जिंकण्यात यश मिळविले. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांच्या शानदार गोलंदाजीमुळे आफ्रिकन संघाचा डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला. या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने 10.5 षटकांतच सामना जिंकला. यासह ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवण्यात टीम इंडियाला यश आले.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्या 6 षटकात 2 विकेट गमावल्या होत्या, स्कोअर 61 पर्यंत पोहोचला तोपर्यंत त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. येथून, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकन संघाला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि त्यांचा डाव 17.1 षटकांत 84 धावांवर संपवला.
भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्राकरने 3.1 षटकात 13 धावा देऊन 4 बळी घेतले, तर राधा यादवने 3 षटकात 6 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळवलेस्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या जोडीने भारतीय महिला संघाला सहज विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आता भारतीय महिला संघ श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळताना दिसणार ज्यामध्ये टीम इंडियाचा सामना 19 जुलै रोजी पाकिस्तानच्या महिला संघाशी होणार आहे.