अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता क्रिकेट विश्लेषकांकडून व्यक्त केली जात होती, पण कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्याच साथीने डावाची सुरुवात केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विराटने तीन चौकार खेचत हा निर्णय योग्य ठरवला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावखुऱ्या मार्को यान्सनला विराट कोहलीने तीन चौकार खेचले आणि भारताच्या डावाची खणखणीत सुरुवात केली.
दुसऱ्या ओव्हरच्या दोन बॉलवर चौकार खेचून रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली पण तिसऱ्याच बॉलवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा केशव महाराजच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात आउट झाला.
त्यानंतर फलंदाजीला आलेला ऋषभ पंत देखील स्वस्तात तंबूत परतला. डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताच्या दोन फलंदाजांना आउट केलं. संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी केलेल्या रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला केशव महाराजने आउट केलं.
तत्पूर्वी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
25 जून 1983, 24 सप्टेंबर 2007 आणि 2 एप्रिल 2011... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या तारखा महत्त्वाच्या आहेत कारण, याच तारखांना भारतीय क्रिकेटसंघाने कोट्यवधी क्रिकेट रसिकांचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं होतं.
आज म्हणजेच 29 जून 2024 ही तारीखही या ऐतिहासिक तारखांच्या यादीत जोडली जाईल की दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात या तारखेला एक सोनेरी पान लिहिलं जाईल हे आपल्याला काही तासांतच कळणार आहे.
टॉस जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही या मैदानावर एक सामना खेळलो आहोत आणि खेळपट्टी चांगली दिसत आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार आहोत. आम्ही संघातील खेळाडूंना शांत राहण्यास सांगितलं आहे. दोन दर्जेदार संघांमध्ये एक चांगला क्रिकेटचा सामना होईल अशी आशा आहे. संघातील प्रत्येक खेळाडू एकत्र येऊन चांगला खेळ करेल ही अपेक्षा आहे. आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही."
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम म्हणाला की, "आम्हीही टॉस जिंकून फलंदाजीचाच निर्णय घेतला असता. आता भारताच्या सुरुवातीच्या विकेट घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हीही आमच्या संघात कोणताही बदल केलेला नाही."
आज (29 जून) बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारताचा क्रिकेट संघ मागच्या 12 महिन्यातला तिसरा अंतिम सामना खेळवला जात आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
जून 2023मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला, नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही प्रकारातील विश्वचषकाचा पहिलाच अंतिम सामना खेळत आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. ज्या प्रमाणे दक्षिण आफ्रिकेला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव नाही अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेल्या एडन मार्करमने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये एकदाही पराभवाच तोंड बघितलेलं नाही.
एकीकडे रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे सारख्या मातब्बर टी20 फलंदाजांची फौज आहे तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे क्विंटन डी-कॉक, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि एडन मार्करम सारखे आक्रमक फलंदाज भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहतील.
जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा सारखे भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतायत तर दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज, तबरेज शम्सी, कागिसो रबाडा सारख्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय संघाच्या जमेच्या बाजू काय आहेत?
बार्बाडोसच्या मैदानावर फिरकी गोलंदाजीपेक्षा वेगवान गोलंदाजी प्रभावी ठरते असा अनुभव असला तरी भारतीय संघ तिन्ही प्रमुख फिरकीपटूंना या सामन्यात संधी देईल अशी शक्यता आहे.
सौराष्ट्रकडून रणजी खेळणारे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. हे दोघेही डावखुरे फिरकीपटू असले तरी उत्तम क्षेत्ररक्षण आणि आक्रमक फलंदाजीमुळे त्यांचं संघातील स्थान सध्यातरी अढळ दिसत आहे.
कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग या दोघांनीही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे आणि मोक्याच्या वेळी भारतीय संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत.
फलंदाजीच्या बाबतीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने सलग दोन अर्धशतके झळकावून भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं आहे.
पहिल्या बॉलपासूनच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माने एक नवीन पद्धत रूढ केली असली तरी संपूर्ण स्पर्धेत विराट कोहलीची बॅट थंड राहिली असल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात नक्कीच थोडी भीती असणार आहे.
असं असलं तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करण्याचा इतिहास असणारा विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसा खेळ करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या जमेच्या बाजू काय आहेत?
दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने टी20 सामन्यांमध्ये चार वेळा रोहित शर्मा आणि चार वेळा विराट कोहलीला आउट केलेलं आहे.
रबाडाने जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही तीनवेळा आउट केलं आहे पण त्याच्या विरोधात त्याने भरपूर धावाही खर्च केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेकडे एडन मार्करम, क्विंटन डी-कॉक, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन सारखे आक्रमक फलंदाज आहेत. तर केशव महाराज, तबरेज शम्सी सारख्या मनगटाच्या जोरावर चेंडूला फिरकी देऊन फलंदाजांना चकवणारे गोलंदाजही आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांत याआधी काय घडलंय?
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 26 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 14 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत.
डेव्हिड मिलरने भारताविरुद्ध 20 सामन्यात 431 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 17 सामन्यात 420 धावा केल्या होत्या आणि सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामन्यात 343 धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत केशव महाराजने 10 सामन्यात 10 बळी घेतले आहेत. अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी चांगली गोलंदाजी केली पण सध्याच्या संघात हे दोघेही नाहीयेत.
गेल्या वर्षी जोहान्सबर्गमध्ये कुलदीप यादवने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. त्याने त्या सामन्यात 2.5 ओव्हर्समध्ये 17 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 3 तर भारताने 2 सामने जिंकले आहेत.