Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL - MI vs SRH: मुंबई इंडियन्सची सुपर ओव्हरमध्ये सनायजर्स हैदराबादवर मात, प्लेऑफमध्ये प्रवेश

IPL - MI vs SRH: मुंबई इंडियन्सची सुपर ओव्हरमध्ये सनायजर्स हैदराबादवर मात, प्लेऑफमध्ये प्रवेश
, शुक्रवार, 3 मे 2019 (10:47 IST)
IPLच्या 12व्या हंगामातील प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सने अखेर नाट्यमयरीत्या प्रवेश केला. चेनई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यापाठोपाठ प्लेऑफमध्ये पोहोचणारी ही तिसरी टीम आहे.
 
गुरुवारी मुंबई इंडियन्सला घरच्या वानखेडे मैदानावर हैदराबाद सनरायजर्सविरोधात संघर्ष करावा लागला. दोन्ही टीममधील सामना आधी बरोबरीत संपला आणि त्यानंतर ओढवलेल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने विजय मिळवला.
 
सुपर ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सनरायजर्स हैदराबादचा मनिष पांडेय रन आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद नबीने एका सिक्स हाणला, पण मुंबईच्या जसप्रीत बुमराहने त्याला चौथ्या बॉलवर बोल्ड करून मुंबईच्या विजयाचा पाया रचला.
 
एकूण हैदराबाद केवळ आठच रन्स करू शकला.
 
सुपर ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी मुंबईला 9 रन्सची गरज होती. हार्दिक पांड्याने 7 आणि किरेन पोलार्डने 2 रन्स करून मुंबईला सहज विजय मिळवून दिला.
 
हार्दिक पांड्याने हैदराबादचा लेग स्पिनर राशिद खानच्या पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला. त्यानंतर पुढच्या बॉलवर एक धाव घेतली. त्यापुढे विजयाची औपचारिकता पोलार्डने पूर्ण केली.
 
बरोबरी कशी झाली?
सुपर ओव्हरमध्ये मनिष पांडेला यश आलं नसलं तरी मॅचमध्ये बरोबरी करण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळेच सुपर ओव्हरची गरज पडली.
 
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 5 बाद 162 रन्स केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादनेसुद्धा 20 ओव्हरमध्ये 6 बाद 162 रन्स केल्या आणि बरोबरी झाली.
 
हैदराबादच्या मनिष पांडेयने नाबाद 71 आणि मोहम्मद नबीने 31 रन्स केल्या. त्यापूर्वी मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने 24 आणि सूर्यकुमार यादवने 23 रन्स केल्या. मात्र मुंबईसाठी सलामी बॅटसमन क्विंटन डी कॉकने 58 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 69 रन्स केल्या.
 
हार्दिक पांड्याने 10 बॉल्समध्ये 1 षटकार आणि तीन चौकारांसह 18 रन्स केल्या. हैदराबादच्या खलील अहमदने 42 रन्स देत 3 विकेट घेतल्या.
 
मनिष पांडेयची खेळी
जिंकण्यासाठी मिळालेले 163 धावांचे लक्ष्य गाठताना एका क्षणी हैदराबादने 14.3 ओव्हरमध्ये 105 रन्सवर 5 विकेटस गमावल्या होत्या. इथपर्यंत मॅचमध्ये फारसं काही विशेष नव्हतं.
 
मात्र यानंतर सुरुवातीपासून टिकून राहिलेल्या मनिष पांडेय आणि मोहम्मद नबीने स्टेडियमध्ये वादळी खेळी केली. नबीने 20 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा केल्या.
 
शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला 17 रन्सची गरज होती. तेव्हा मनीष पांडेय, मोहम्मद नबीने हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर चांगली खेळी केली.
 
पांड्याच्या पहिल्या दोन बॉलवर दोन रन्स केल्या. मात्र नबीने तिसऱ्या बॉलवर लाँग ऑनला सिक्स मारल्यावर पुढच्या चेंडूवर तो सूर्यकुमारने कॅच घेतल्यामुळे तो बाद झाला.
 
पुढच्या बॉलवर मनिष पांडेयने दोन रन्स केल्या. शेवटच्या चेंडूवर हैदराबादला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज होती. पांड्याच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला मनीष पांडेयने थेट बाँड्रीपार धाडले.
 
हैदराबादच्याही आता 20 ओव्हरमध्ये 162 रन्स झाल्या होत्या. मनिष पांडेयने 47 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांसह 71 रन्स केल्या. हैदराबादचा सलामी बॅटसमन रिद्धिमान साहाने सुद्धा 25 रन्स केल्या.
 
रोमहर्षक सामना
मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्याने दोन-दोन विकेटस घेतल्या.
 
सामना संपल्यावर मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने सुपर ओव्हर करणाऱ्या बुमराहचे भरपूर कौतुक केले. तसंच पहिल्यांदा बॅटिंग केल्यामुळे स्कोअरबोर्डवरील धावसंख्या विरोधी संघावर दबाव वाढवते असेही तो म्हणाला.
 
प्लेऑफ
मुंबईने या विजयाबरोबर प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला. आता प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ कोणता असेल, हे आताच सांगणं कठीण आहे.
 
चेन्नई सुपर किंग्जने 13 सामन्यांमध्ये 9 विजयांबरोबर 18 अंक मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला धावांच्या सरासरीमुळे मागे टाकून 13 सामन्यांत 8 विजयांसह 16 अंक पटकावून दुसरा नंबर मिळवला आहे.
 
दिल्ली कॅपिटल्सने 13 सामन्यांत 8 विजय मिळवून 16 अंकांसह तिसऱ्य़ा आणि सनरायजर्स हैदराबाद 13 सामन्यांत 6 विजयांसह 12 अंक मिळवून चौथ्या स्थानावर आहे.
 
आज शुक्रवारी मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात कोलकाता नाईट रायडर्स समोरासमोर येतील. दोन्ही टीम्सनी 12-12 सामन्यांत प्रत्येकी 5 विजय मिळवून प्रत्येकी 10 अंक मिळवले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फॉनीः ओडिशा किनाऱ्यावर थडकलं चक्रीवादळ, हजारोंना सुरक्षितस्थळी हलवलं